खासदार डॉ. कोल्हेंना चिमटा.
खेड, पुणे | दीड वर्षाहून अधिक काळ कारागृहात घालवलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी बाहेर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वाकळवाडी (ता. खेड ) येथील यात्रेनिमित्त सहकुटुंब वाळकेश्वराचे दर्शन घेऊन बैलगाडा घाटातील व्यासपीठावर उपस्थित राहुन पुन्हा त्याच शैलीत भाषण करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
पैलवान म्हणून ओळख असलेले मंगलदास बांदल त्यांच्या राजकीय डावपेचांमुळे देखील ओळखले जातात. त्याचबरोबर बांदल यांच्या वक्तृत्वाचे कौतुक त्यांचे विरोधकही करत असतात. कारागृहातून बाहेर येताच बांदल यांनी दुसऱ्याच दिवशी आपल्या वक्तृत्वाची झलक खेड तालुक्यातील वाकळवाडी येथील यात्रेत दाखवून दिली. महाशिवरात्री निमित्त आयोजित वाळकेश्वर देवाच्या यात्रेला बांदल यांनी हजेरी लावली. यावेळी दर्शन घेतल्यानंतर काही दिवस कारागृहात असल्याची कबुली देत मंगलदास बांदल यांनी लहानपणीच्या आठवणी सांगत मी देखील शेजारच्याच पारगावचा (ता. आंबेगाव) असल्याची आठवण करून दिली.
या देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा अशी इच्छा व्यक्त करत या भागातील लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न करावे असा सल्लाही बांदल यांनी यावेळी दिला. बरं एवढ्यावरच थांबतील तर ते बांदल कसले ? दरम्यान विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना चिमटा काढत बांदल म्हणाले की, “खासदार जर याठिकाणी आले तर त्यांना सांगा बैलगाडा मालकांनी तुम्हाला फार मदत केली आहे, या देवस्थानाला तीर्थस्थळाचा दर्जा देण्यासाठी मदत करा”. त्याचबरोबर बैलगाडा मालकांची ताकद संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. यकामासाठी बैलगाडा मालकांनीही ताकद लावावी कारण ‘गाडा मालकांनी एकदा चाबूक वाजवला की पुढारी देखील सरळ चालतो’ अशा भावना व्यक्त करत उपस्थितांचे आपल्या वक्तृत्वशैलीमुळे बांदल यांनी लक्ष वेधून घेतले.
Add Comment