शिरुर तालुक्यातील खळबळजनक प्रकार.
शिरुर, पुणे | शेतकऱ्यांना दिलासा म्हणून विविध सहकारी सोसायटीच्या मार्फत जिल्हा बँकेकडून कर्जपुरवठा केला जातो. या सहकारी सोसायटीवर संचालक म्हणून निवडून गेलेले अनेकजण सोसायटीच्या अर्थकारणाशी बिलगलेले असतात. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना याच सोसायटीचे संचालकच व्याजाने पैसे देऊन सोसायटीचा भरणा करण्यासाठी जाच करतात याचीही अनेक उदाहरणे आहेत. अनेक गावांत व्याजाने पैसे देऊन जमिनी लाटणारे खाजगी सावकारही याच सोसायटीचे संचालक, चेअरमन असतात. अशाच प्रकारे पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील बाभूळसर बुद्रुक गावच्या शहाजी मचाले या शेतकऱ्याने सोसायटीच्या संचालक, चेअरमन, सचिव यांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरासमोर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मचाले यांना न घेतलेल्या कर्जाचा जाच होत होता गेल्या अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या शहाजी मचाले या शेतकऱ्याने आपल्याला न्याय मिळत नाही या भावनेने खचून जात जीवन संपविले. कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख करत चिट्टी देखील लिहून ठेवली.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आता भीती आहे की, हे प्रकरण दाबले जाऊ शकते. न्यायालयीन लढा देणाऱ्या मचाले यांना अजूनपर्यंत न्याय तर मिळालाच नाही परंतु न घेतलेल्या कर्जाचा एवढा जाच होता की बँकेकडून जप्तीचे आदेश देखील निघाले होते. गेले अनेक वर्षे वारंवार जिवाच्या आकांताने यंत्रणेच्या गलथान कारभाराच्या विरोधात लढणाऱ्या शहाजी मचाले यांना न घेतलेल्या कर्जाचा जाच सहन झाला नाही. या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवावे लागले.
याबाबत गणेश तानाजी मचाले यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे की, माझे आजोबा ज्ञानदेव दशरथ मचाले यांचे बाभुळसर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे खाते होते त्यांनी कधीही सोसायटीचे कर्ज घेतले नव्हते तरीही त्यांच्या नावावर बोगस कर्ज दाखविले गेले व त्याचा भरणा माझे चुलते मयत शहाजी ज्ञानदेव मचाले यांच्या उसबिलातून त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता कपात करून घेतले. त्यानंतर शहाजी मंचाले यांनी सोसायटीकडे कर्ज काढले नसताना पैसे का कापून घेतले याबाबत विचारणा केली. मयत शहाजी मचाले यांनी वारंवार कर्ज प्रकरणाच्या कागदपत्राची मागणी सोसायटीचे सचिव आणि बँक व्यवस्थापक यांच्याकडे केली. परंतु कोणतीही कागदपत्रे बँक आणि सोसायटीकडून पुरवली नाहीत. जे कर्ज काढले नाही त्याची भरपाई करावी लागत असल्याने शहाजी मचाले हे सोसायटीकडे दाद मागत होते. आजपर्यंत सोसायटीने त्यांना दाद दिली नाही. त्यांना सोसायटीकडून शेती जप्तीची नोटिस आलेली होती त्यामुळे ते सतत तनावाखाली होते त्यामुळे मचाले यांनी आपला जीवनप्रवास संपविला.
या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शहाजी मचाले यांच्या शर्टच्या खिशात एक चिठी मिळून आली. त्यावर बाबुळसर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नवनाथ चंद्रकांत फराटे, बाळासो बबन फराटे, मच्छीद्र सुखदेव संकपाळ, अनिल सुभाष लोहार, अर्जुन प्रल्हाद जगताप, विजय सोपान नागवडे, विजय चव्हाण त्याचबरोबर तत्कालीन संचालक मंडळ यांनी कर्ज भरणा करण्यासाठी जाच केल्याने शहाजी ज्ञानदेव मचाले यांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान न घेतलेले कर्ज भरण्यासाठी सोसायटीच्या संचालक आणि सचिव यांनी केलेल्या जाचामुळे एखाद्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते ही प्रगतशील शिरुर तालुक्यासाठी दुर्दैवी गोष्ट आहे. शेतकऱ्याने कर्ज घेतलेच नाही हे पटवून देण्यासाठी एखाद्या शेतकऱ्याला प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागतात आणि एवढं करूनही न्याय मिळत नाही ही भावना सहन न झाल्याने कदाचित मचाले यांनी टोकाचा निर्णय घेतला असावा. परंतु या शेतकऱ्याची आत्महत्या ही अत्यंत गंभीर बाब आहे. सहकारी सोसायटीच्या आडून अनेकांचे खाजगी सावकारी धंदे सुरू आहेत. या सोसायटीच्या संचालक मंडळावर बसून असे धंदे करण्यासाठी आणखी मुभा मिळते. बोगस शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेतले जाते. त्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागतो. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
Add Comment