मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची पुणे जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी नुकतीच भेट घेतली, मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असावी याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मंगलदास बांदल यांनी कारागृहातून बाहेर आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पुढची राजकीय भूमिका जाहीर केली, यामध्ये आगामी प्रत्येक निवडणूक लढविण्याचा निर्धार त्यांनी केला. याशिवाय नाव न घेता राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचेच मला कारागृहात पाठविल्याचे सांगितले, मात्र दुसरीकडे वाढदिवसाचा मुहूर्त साधून बांदल यांनी राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.
मंगलदास बांदल यांच्यावर गुन्हे दाखल होताच त्यांची दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने पक्षातून हकालपट्टी केली. स्थानिक पातळीवर सर्व पक्षीय नेत्यांशी संबंध ठेऊन शिरुरच्या राजकारणात कायम आपला दबदबा निर्माण करणारे बांदल नेहमीच चर्चेत असतात. शिरुरच्या राजकारणात आमदार अशोक पवार यांच्या विरोधी भूमिका घेणारे बांदल मात्र नेहमीच राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांच्या संपर्कात असतात हे त्याचच एक उदाहरण आहे. नुकत्याच पार्थ पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक नेत्यांनी सोशल मीडिया आणि फ्लेक्सद्वारे शुभेच्छा दिल्या मात्र बांदल यांनी थेट पार्थ पवार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्यात्यामुळे बांदल यांच्या डोक्यात काय चालू आहे याबाबत तर्क – वितर्क लढविले जात आहेत.
या भेटीबाबत मंगलदास बांदल यांना विचारले असता त्यांनी सांगितले की ‘पार्थ पवार आणि मी गेल्या अनेक वर्षांपासून संपर्कात आहे, आम्ही दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहोत, दोन दिवसांपूर्वी त्यांचा वाढदिवस झाला त्यामुळे मुंबईत भेटून मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं गैर काय ?’ असा प्रतिप्रश्नच त्यांनी केला. दरम्यान पार्थ पवार यांनी गेल्या २०१९ ची मावळ लोकसभा निवडणुक वाढविली आहे, त्याचबरोबर मंगलदास बांदल यांनी देखील २०१९ च्या शिरुर लोकसभेच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले होते. मात्र अनेक राजकीय घडामोडीनंतर बांदल यांनी आपली तलवार म्यान केली होती. मात्र आता येणारी २०२४ ची लोकसभा निवडणूक मोठ्या ताकदीने लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी मंगलदास बांदल यांची झालेली भेट राजकीय समीक्षकांना गोंधळात टाकणारी आहे.
Add Comment