ताज्या घडामोडी शिरूर

पीककर्ज भरायचे, कारखाना ऊसाचे पैसे देईना, शेतकरी हतबल..!

भिक मागत नाही ; शेतकऱ्याचे पत्र व्हायरल.

शिरुर, पुणे | ‘मी कारखान्याला पत्र लिहून भिक मागत नाही तर माझ्याच मालाचे नियमाप्रमाणे अर्थात एफआरपी नुसार मला पैसे द्या’ अशी विनंती घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आणि कार्यकारी संचालक यांना एका शेतकऱ्याने केली आहे. दोन वेळा पत्र लिहूनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने शेतकरी फत्तेसिंग प्रेमराज वाबळे हतबल झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

माझ्यासह असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना दोन महिने उलटून गेले तरीही उसाच्या बिलाचे पैसे मिळले नाहीत. मार्च अखेर पीक कर्जाची रक्कम भरणे आवश्यक असतानाही बँक खात्यात अद्याप शेतमालाचे पैसे जमा झाले नाही. जर मार्च अखेर पीक कर्ज भरले नाही तर थकबाकीदार म्हणून व्याजाची रक्कम वाढणार असल्याने आम्ही हतबल झालो आहोत. जर उसाचे पैसे मिळणार नसतील तर किमान तोपर्यंत पीक कर्ज भरणा करण्यासाठी पुणे जिल्हा सहकारी बँकेने मुदतवाढ द्यायला हवी अशी इच्छा देखील वाबळे यांनी व्यक्त केली आहे.

खरतर कारखान्याने शेतातून ऊस तोडून नेल्यानंतर पंधरा दिवसांत बिलाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करणे आवश्यक होते. परंतु तसे न झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. शिरुर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच गेल्या काही महिन्यांपूर्वी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. मोठ्या विश्वासाने शेतकरी सभासदांनी केवळ एक जागा विरोधकांच्या पारड्यात टाकत उर्वरित सर्व जागा पवार यांच्या पॅनेलच्या निवडून दिल्या, यामध्ये आमदार अशोक पवार यांच्या मुलाला बिनविरोध संचालकही केले पुढे मुलगा ऋषीराज पवार यांनाच कारखान्याचे बिनविरोध चेअरमन देखील करण्यात आले.

अनेक शेतकऱ्यांनी उसाच्या येणाऱ्या बिलावर खते – औषध दुकानदारांची, किराणा दुकानदारांची, खाजगी सावकारांची उधारी करून ठेवलेली असते. त्याचबरोबर अनेक शेतकरी पीक कर्जही घेतात हे पीक कर्ज बँकांना मार्च अखेर परत करण्याची वेळ असते. मात्र या सगळ्या भानगडीत आपल्या शेतमालाचे पैसे वेळेत मिळाले नाही तर संपूर्ण साखळी बिघडते आणि शेतकरी हतबल होतो याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे उसाचे पैसे एफआरपी प्रमाणे वेळेत कारखान्याने जमा करावे अशीच अपेक्षा केली जात आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!