शिरूर, पुणे | जिजामाता महिला सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. गेली अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात राजकारण करणाऱ्या नेत्यांनी या निवडणुकीत मात्र एकमेकांचा हात हातात घेऊन प्रचार करणे पसंद केले असल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे.
३१ मार्च रोजी जिजामाता महिला सहकारी बँकेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. याच दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्याने शिरुर तालुक्याच्या राजकारणात नवा मोड आलेला आहे. यामध्ये ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी निवडणूक पासून तर विधानसभा निवडणुकीपर्यंत एकमेकांच्या विरोधात प्रचार करणारे काकासाहेब खळदकर आणि आमदार अशोक पवार यांच्यात या निवडणुकीत समेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर इकडे एकेकाळचे एकमेकांचे मित्र व पुढे राजकारणात ग्रामपंचायत पासून तालुक्याच्या राजकारणात एकमेकांचे विरोधक आबाराजे मांढरे आणि मंगलदास बांदल हे देखील या निवडणुकीत हातात हात घेऊन प्रचार करताना पहायला मिळणार आहेत.
वडगाव रासाई ग्रामपंचायतची सत्ता आमदार अशोक पवार यांच्या विरुद्ध पॅनेलने काबीज केली तेव्हापासून वडगाव रासाईच्या ग्रामपंचायत निकालाबाबत सातत्याने चर्चा होत असतात. आमदार पवार यांच्या विरुद्ध पॅनेलचे नेतृत्व काकासाहेब खळदकर यांनी केले होते. त्याचबरोबर विधानसभा निवडणूक असो किंवा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असो काकासाहेब खळदकर आणि अशोक पवार या दोघांचे राजकीय वैर संपूर्ण तालुक्यानेच पाहिले आहे. आमदार अशोक पवार नेतृत्व करत असलेल्या प्रत्येक निवडणुकीत काकासाहेब खळदकर विरोधक म्हणून ठाम भूमिका घेत असत, मात्र जिजामाता महिला सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांचे फोनवर संभाषण देखील झाल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे आबाराजे मांढरे आणि मंगलदास बांदल यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र या जिजामाता महिला सहकारी बँकेच्या निवडणुकी निमित्ताने एकाच पॅनेलचा हे दोघेही प्रचार करणार आहेत. त्याचबरोबर आमदार अशोक पवार यांच्यावर आबाराजे मांढरे नाराज असल्याच्या चर्चा सातत्याने होत असतात त्यामुळे आमदार अशोक पवार यांचे राजकीय विरोधक असलेल्या मंगलदास बांदल यांच्याशी जुळवून घेत मांढरे आणि बांदल सोबत बँकेच्या निवडणुकीचा प्रचार करताना दिसले तर नवल वाटायला नको.
मंगलदास बांदल यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल आणि काकासाहेब खळदकर यांच्या पत्नी संगिता खळदकर या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधात उमेदवार असणार आहेत. तर बांदल यांच्या पत्नी ज्या पॅनेलकडून लढत आहेत त्याच पॅनेलच्या खुल्या प्रवर्गातून आबाराजे मांढरे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आबाराजे मांढरे यांच्यासह बांदल यांच्या विरोधात खळदकर यांचा प्रचार आमदार अशोक पवार करतील का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
खळदकरांच्या संघर्षाची नवी मालिका…!
गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आमदार अशोक पवार यांच्या विरोधात गावपातळी पासून तर जिल्हा पातळीपर्यंत प्रत्येक निवडणुकीत विरोधी भूमिका घेणाऱ्या काकासाहेब खळदकर यांना संघर्ष करावा लागला आहे. मग तो नुकत्याच झालेल्या वडगाव रासाईच्या सहकारी सोसायटीचा निकाल असो वा घोडगंगा कारखान्याच्या रिंगणातून उमेदवारी अर्ज बाद होणे. किंवा पवार यांच्या विरोधात जिल्हा बँकेचा प्रचार. या सगळ्या भानगडीत मंगलदास बांदल यांच्या पत्नी विरोधात काकासाहेब खळदकर यांच्या पत्नीचा जिजामाता सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज असल्याने इथेही खळदकर यांना संघर्ष करावा लागणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेऊन उलटसुलट चर्चा होण्यापेक्षा खळदकर यांनी निवडणूक लढविणे पसंद केले आहे.
अशोक पवारांची खळदकरांना टाळी..!
काकासाहेब खळदकर यांनी ‘The बातमी ‘शी बोलताना सांगितले की, राजकारण करण्यासाठी तालुक्यातील इतर निवडणुका आहेत, परंतु या बँकेशी माझे कौटुंबिक संबंध आहेत. कोण कोणाच्या विरोधात आहे किंवा कोण कोणाला मदत करेल यापेक्षा ही बँक व्यवस्थित चालली पाहिजे यासाठी बँकेवर चांगल्या संचालक मंडळाची गरज आहे. बँकेच्या हितासाठी काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. माझ्याशी आमदार अशोक पवार यांनी संपर्क केला ही माहिती खरी असली तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी माझ्या मित्र परिवार आणि नातेवाईकांना कोणी किती संपर्क केला आणि त्याचा काय उपयोग झाला हे निवडणुकीच्या निकालानंतर कळेलच. दरम्यान बांदल आणि खळदकर एकमेकांच्या विरोधात असल्याने मंगलदास बांदल यांना शह देण्यासाठी अशोक पवार यांनी खळदकरकरांना टाळी दिली असल्याचे बोलले जात आहे.
Add Comment