आंबेगाव खेड ताज्या घडामोडी पुणे राजकीय शिरूर

भाजपकडे शिरुर लोकसभा मतदारसंघात आता जय-श्री-राम…!

शिरुर, पुणे | उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांपासून शिवसेनेचा गड सांभाळणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जवळ केले. आढळराव पाटील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आपल्या सोबत शिंदे गटात घेऊन गेले. उर्वरित अनेक पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून संभ्रम अवस्थेत होते. त्यापैकी आढळराव पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्ष संघटनेत काम करणारे माजी जिल्हा प्रमुख राम गावडे आणि २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या जयश्री पलांडे हे दोघेही शिरुर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन येत्या ५ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघात भाजपच्या नेत्यांमध्ये आता जयश्री पलांडे आणि राम गावडे अर्थात जयश्री, राम पाहायला मिळणार आहेत.

जयश्री पलांडे या १९९० पासून राजकारणात सक्रिय झाल्या पुढे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिरुर तालुक्यात भाजपचा विस्तार केला. शिरुर तालुक्यातील एक आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. १९९७ साली पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या, पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. १९९९ ची शिरुर विधानसभा निवडणूक त्यांनी लढविली आहे तर २००४ च्या विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने त्या भाजपवर नाराज होत्या पुढे त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांना जिल्हा बँकेवर काम करण्याची संधी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेकडून त्यांनी २००७ ची केंदूर – पाबळ गटातून पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक लढविली या निवडणुकीत अपक्ष मंगलदास बांदल यांनी त्यांचा पराभव केला. २०१४ साली स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा पलांडे यांची घरवापसी झाली. मात्र स्थानिक नेत्यांशी त्यांचे मतभेद असल्याने २०१७ ची केंदूर – पाबळ गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून लढविली.

त्याचबरोबर ‘शिवसेनेचा राम’ म्हणून ओळख असलेल्या राम गावडे यांनी खेड तालुक्यातील धानोरे येथील शाखा प्रमुखपदापासून १९९१ मध्ये राजकीय कारर्किदीस सुरुवात केली. पक्ष संघटनेतील अनेक पदांवर काम करुन २०१४ पासून तब्बल सहा वर्षे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद भूषविले आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळ, श्री. भैरवनाथ सहकारी नागरी पतसंस्था अशा अनेक ठिकाणी गावडे यांनी राजकीय क्षेत्रात काम केले आहे. आढळराव पाटील यांच्यासोबत संपूर्ण शिरुर लोकसभा मतदार संघात त्यांनी जनसंपर्क वाढविला आहे. त्यामुळेच संपूर्ण शिरुर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन ते येत्या ५ तारखेला भाजपत प्रवेश करीत आहेत.

जयश्री पलांडे आणि राम गावडे या दोघांनाही भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात येत्या ५ एप्रिलला होणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या शिरुर लोकसभा मतदार संघात आता जयश्री, राम पाहायला मिळणार आहे.

error: Copying content is not allowed!!!