ताज्या घडामोडी राजकीय शिरूर हवेली

पलांडेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फडणवीस शिरुरला येणार..!

मुंबई | शिरुर तालुक्यातील आक्रमक नेत्या म्हणून ओळख असलेल्या जयश्री पलांडे यांनी शिवसेनेतून पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालय मुंबई येथे शिवसेनेच्या जयश्री पलांडे आणि राम गावडे यांचा पक्ष प्रवेश झाला. रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट पलांडे आणि गावडे यांनी घेतली.

१९९० पासून शिरुरच्या राजकारणात सक्रिय असलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्या आणि जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे यांचा स्वगृही प्रवेश झाला. भाजपमध्ये प्रवेश देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढचा शिरुरचा आमदार भाजपचाच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. जयश्री पलांडे यांच्या सोबत रवींद्र गायकवाड, समाधान डोके, बाप्पू मासळकर, दत्ता वाजे, मारुती शेळके, दादा वाजे यांसह अनेक शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी नारायण राणे यांनी देखील पलांडे आणि गावडे यांचे पक्षात स्वागत करत सत्कार केला. रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच पलांडे माघारी परतल्या.

दरम्यान फडणवीस यांनी पलांडे यांना पक्ष वाढीसाठी कामाला लागा असा सल्ला यावेळी दिला त्याचबरोबर जयश्री पलांडे यांनी १९९५ साली सुरू केलेल्या कै. रामराव गेनूजी पलांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे उद्घाटन गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पलांडे यांनी भाजपची सत्ता आल्यानंतरच भाजपच्या मोठ्या नेत्याच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन करण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु दरम्यानच्या काळात राजकीय काही स्थित्यंतरे घडल्यामुळे हे स्वप्न अपूर्ण राहिले होते, जयश्री पलांडे यांचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिरुर तालुक्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याचे जयश्री पलांडे यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, धर्मेंद्र खंडारे, आशा बुचके, शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, राजेंद्र कोरेकर, राजेंद्र ढमढेरे, तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, जयेश शिंदे, रोहित खैरे यांसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Copying content is not allowed!!!