पुणे, | शिरुर तालुक्याच्या राजकारणात अत्यंत रंजक ठरलेल्या जिजामाता महिला सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल तालुक्यातील बड्या नेत्यांना धक्का देणारा ठरला आहे. सुरुवातीला छुप्या आणि नंतर उघड पध्दतीने मंगलदास बांदल, जाकीरखान पठाण, आबाराजे मांढरे यांना एकत्र करून राजकीय डावपेच टाकणाऱ्या शेखर पाचूंदकर यांचा फॅक्टर या निवडणुकीत यशस्वी ठरला आहे. तर राजकीय दृष्टीने मंगलदास बांदल, आबाराजे मांढरे यांना या यशामुळे उर्जितावस्था प्राप्त झाली आहे.
जिजामाता महिला सहकारी बँकेवर शिरुर तालुका आणि परिसरात नेहमी वर्चस्व ठेऊ पाहणाऱ्या आमदार अशोक पवार यांना या निवडणुकीत सपशेल अपयश आले आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यापासून आमदार अशोक पवार यांनी या निवडणुकीची सर्व सूत्र स्वतः च्या हाती घेतली होती. मंगलदास बांदल यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर मात्र आमदार पवार आणि पत्नी सुजाता पवार यांनी अधिकच या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले होते. बांदल यांचा पराभव करण्यासाठी वेळप्रसंगी नेहमीच विरोधकाची भूमिका प्रामाणिकपणे निभावणाऱ्या काकासाहेब खळदकर यांच्याशी आमदार पवार यांनी हातमिळवणी केली.
तर दुसरीकडे एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे मंगलदास बांदल आणि आबाराजे मांढरे यांच्यात समेट घडवत बँकेशी संलग्न असलेल्या जाकीरखान पठाण, संतोष शितोळे, शरद कालेवर यांची मोट बांधून पॅनेल तयार करत अनोखा प्रयोग शेखर पांचूंदकर यांनी यशस्वी केला. सुरुवातीला छुप्या पद्धतीने बैठका घेत राजकीय डावपेचांचा वापर करून शेखर पाचूंदकर, मंगलदास बांदल, आबाराजे मांढरे यांनी वातावरण निर्माण केले तर नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर उघड पद्धतीने या तिघांनीही एकाच गाडीत प्रवास करत निवडणुकीचा प्रचार केला. शिरुर तालुक्यातील अनेक बड्या नेत्यांची फौज आमदार अशोक पवार यांच्या बाजूने असतानाही या निवडणुकीत मात्र पवारांचा करिष्मा चालला नाही.
रेखा बांदल, रामभाऊ सासवडे, कुसुम मांढरे, स्मिता पांचूंदकर, संतोष शितोळे यांनी थेट मतदारांशी संवाद साधला. भाजपचे काकासाहेब खळदकर ऐनवेळी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनेलकडून लढत असल्याने भाजपच्या नेत्यांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. तर या जिजामाता महिला सहकारी बँक निवडणुकीच्या निमित्ताने राजमाता पॅनेलचे नेतृत्व करणाऱ्या आमदार अशोक पवार आणि राजमाता जिजाऊ पॅनेलचे नेतृत्व करणाऱ्या शेखर पांचूंदकर यांच्यासह मंगलदास बांदल यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर १३ विरुद्ध ० अशी एकहाती जिजामाता महिला सहकारी बँकेवर पांचूंदकर, बांदल, मांढरे यांनी सत्ता प्रस्तापित केली आहे. शिरुर तालुक्यातील आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची निवडणूक ठरली असल्याचे बोलले जात आहे.
Add Comment