आंबेगाव ताज्या घडामोडी राजकीय

देवदत्त निकमांची बंडखोरी, आंबेगाव तालुका राष्ट्रवादीला ग्रहण.

मंचर, पुणे | मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने माजी सभापती आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले देवदत्त निकम यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत एकला चलो रे चा नारा दिला आहे. वळसे पाटील यांच्या अनेकदा अनुपस्थितीत शिरुर – आंबेगाव मतदार संघात देवदत्त निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी केली, मात्र निकम यांनाच उमेदवारी नाकारल्याने देवदत्त निकम यांनी अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले, निकामांच्या बंडखोरीमुळे आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रहण लागले आहे.

दरम्यान उमेदवारी नाकारल्यानंतरही ‘आपण माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा फोटो वापरून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे,’ असे निकम यांनी जाहीर केले आहे. एकसंघ असणाऱ्या आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. बाजार समितीचे सभापती आणि शिरूर लोकसभेची निवडणूक लढवलेले माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक देवदत्त निकम यांनाच उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे. देवदत्त निकम यांनी मात्र आपण दिलीप वळसे पाटील यांचा फोटो वापरून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. देवदत्त निकम यांनी आपण निवडणूक लढविणार असल्याचे सांगून एक प्रकारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या निर्णयाला आव्हान देऊन आंबेगाव तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे. ते म्हणाले की, “राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरणे, त्यांच्या मुलाखती घेणे. या सर्व प्रक्रियेत मी होतो. पण मला उमेदवारी नाकारल्याने दुःख झाले असून मानसिक धक्का बसला आहे.

मी १९९० पासून आतापर्यंत निष्ठेने काम केले आहे. देशातील पहिली डिजिटल बाजार समिती केली. गेली सहा वर्ष शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळून देण्यासाठी तसेच शेती मालाला निवारा उपलब्ध होण्यासाठी काम केले. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समवेत आज (ता. २० एप्रिल) सकाळी चर्चाही केली. त्यांना आपण निवडणुकीतून माघार घेणार नाही, असेही सांगितले होते. त्यांनी तुम्हाला कळवतो, असे सूचित केले. पण नंतर त्यांनी आणि पक्षानेही माझ्याशी संपर्क केला नाही, अशी भावना देवदत्त निकम यांनी बोलून दाखवली. त्यामुळे या बंडखोरीचे पडसाद मतदार संघात उमटणार नाही याची काळजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घ्यावी लागणार आहे.

error: Copying content is not allowed!!!