निवडणुकीमुळे राष्ट्रवादीतला वाद चव्हाट्यावर.
पुणे | पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, त्यामुळे सहजासहजी राष्ट्रवादीत बंड होत नाही. त्यात आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिस्तीचे पालन केले जाते, नव्हे नव्हे तर करावेच लागते. राज्यात प्रमुख नेत्यांमध्ये एक असलेल्या माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात आंबेगाव – शिरुर या दोनही भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडाची ठिणगी पडली आहे.
गावचे सरपंच, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, मंचर बाजार समितीचे मा. सभापती त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील यांचे राजकीय विरोधक शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात २०१४ ची लोकसभा निवडणुक लढविलेले देवदत्त निकम यांची मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडाचे हत्यार उपसले आहे.
तळागाळातील नेता, शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून ओळख असलेल्या देवदत्त निकमांना उमेदवारी नाकारणे ही पक्षाची सर्वात मोठी चूक आहे अशी चर्चा राष्ट्रवादीतीलच कार्यकर्ता उघड उघड करत आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली, त्या निवडणुकीतही देवदत्त निकम यांचा गट सोडून इतर गट बिनविरोध झाले. मात्र निकमांना निवडणुकीस सामोरे जावे लागले, त्याच वेळी राष्ट्रवादी पक्षाकडून देवदत्त निकम यांना डावलले जात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असताना निकम यांनी संपूर्ण आंबेगाव तालुका आणि शिरुरच्या ३९ गावांत संपर्क वाढवला. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात, कारखान्याच्या गट कार्यालयात जात शेतकरी आणि कारखाना यांच्या मधला दुवा होण्याचे काम निकमांनी केले. स्वतः उत्तम शेतकरी असल्याने थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत उसाच्या पीकाबाबत शेतकऱ्यांना उत्तम मार्गदर्शन केले.
मंचर बाजार समितीचे सभापती झाल्यानंतरही त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले त्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा अधिकच निकम यांच्याकडे वाढत गेला. गेल्या काही महिन्यांपासून शिरुर भागात दिलीप वळसे पाटील यांच्या दौऱ्यात भाषण करताना निकम केवळ शेतकऱ्यांच्या अडीअडचणींचा पाढा वाचत होते. जसे की, बिबट्याची दहशत, वीजपुरवठा, रोहित्र वेळेवर न मिळणे, धरणाचे पाणी यासंदर्भातील मतदार संघातील अनेक समस्यांची जाणीवच जणू वळसे पाटीलांना करून देत होते की काय ? असा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित केला जात होता.
बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने देवदत्त निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर नुकतीच जिजामाता महिला सहकारी बँकेची निवडणूक पार पडली या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद यानिमित्ताने उघड झाला. शिरुर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी जिजामाता महिला सहकारी बँकेच्या निवडणुकीत बँकेच्या प्रमुख लोकांना सोबत घेऊन पॅनेलचे नेतृत्व केले. परंतु त्यांच्याच विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या शेखर पाचुंदकर यांनी पॅनेलची जुळवाजुळव करून थेट आमदार अशोक पवार यांनाच आव्हान दिले. शेवटी आमदार अशोक पवार यांच्या संपूर्ण पॅनेलचा मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यामुळे तिकडे आंबेगाव तालुक्यामध्ये देवदत्त निकम यांची बंडखोरी आणि इकडे शिरुरमध्ये थेट पक्षाच्या आमदारांनाच शेखर पाचुंदकर यांनी आव्हान दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
दरम्यान शिरूरच्या ३९ गावांत देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्याचे सातत्याने जाणवते. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याने हा वाद अद्याप स्पष्ट दिसत नसला तरी, तीनही गटात एकमेकांचे कट्टर समर्थक असलेले नेते आणि नव्याने उभारी घेऊ पाहणारे कार्यकर्ते यांच्यातच उमेदवारी मिळावी यासाठी आत्ताच स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणाऱ्या वादाची ठिणगी आत्ताच पडली आहे की काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.
Add Comment