शिरूर, पुणे | पुणे जिल्हा अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. पुणे जिल्ह्यात भाजपचा प्रभाव तसा कमीच पाहायला मिळतो. त्यातही मावळ, दौंड आणि शिरुर वगळता इतर तालुक्यामध्ये भाजपला फारसे यश मिळाले नाही. भाजप सद्या केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आहे. भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी गणेश भेगडे कार्यरत आहेत, त्यांचा कार्यकाल पूर्ण झाला असल्याने जिल्हा कार्यकारिणीत बदल अपेक्षित आहेत.
पुणे ग्रामीणसाठी भाजपचे आता दोन जिल्हाध्यक्ष असणार आहेत, यामध्ये शिरुर लोकसभेच्या ग्रामीण भागातील तालुक्यांसह मावळचा समावेश असलेल्या भागासाठी एक जिल्हाध्यक्ष तर तिकडे बारामती लोकसभा ग्रामीण भागासाठी एक जिल्हाध्यक्ष असे भाजपचे दोन जिल्हाध्यक्ष यापुढे पुणे जिल्हा कार्यकारिणीत पहायला मिळतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान बारामती लोकसभा ग्रामीण भागासाठी खुद्द आमदार राहुल कुल यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळू शकते अशी शक्यता असली तरी राहुल कुल मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या शर्यतीत असल्याने जिल्हाध्यक्ष पदासाठी ते स्वतः तरी उत्सुक नसतील.
तर इकडे मावळसह शिरुर लोकसभा ग्रामीण भागासाठी नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या नावाची चर्चा आहे. जिल्हा बँकेतील निवडणुकीत कंद यांचा विजय त्यानंतर महाराष्ट्रभर गाजलेल्या हवेली बाजार समितीची निवडणूक त्यातही अजित पवारांच्या सहकाऱ्यांचा पराभव करत कंद यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनेलने हवेली बाजार समितीच्या निवडणुकीतील मिळवलेले यश. त्यामुळे प्रदीप कंद यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळू शकते. परंतु विधानसभेचे स्वप्न पाहणारे प्रदीप कंद मात्र मतदार संघातच पाहायला मिळत नाहीत तर आणखी पक्ष संघटनेची जबाबदारी कशी निभावणार यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. त्यामुळे पुन्हा गणेश भेगडे यांनाच जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारायला लागू शकते.
जिल्हाध्यक्ष बदलानंतर तालुकाध्यक्षांची देखील खांदेपालट होण्याची शक्यता आहे. अचानकपणे शिरूर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळालेल्या आबासाहेब सोनवणे यांनी एक वर्षाचा कार्यकाळ गाजवला. प्रशासनावरील वचक आणि पक्षसंघटनेतील बूथकमिटी बळकट करण्यासाठी केलेले प्रयत्न त्याचबरोबर संपूर्ण तालुक्यात वाढवलेला जनसंपर्क यामुळे आबासाहेब सोनवणे यांचा कार्यकाळ चर्चेत आला. तर भाजपच्या कामगार जिल्हा आघाडीचे अध्यक्ष जयेश शिंदे यांच्या नावाचाही शिरुर तालुकाध्यक्ष पदासाठी विचार होऊ शकतो. कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजना थेट गोरगरीब जनतेच्या घरात पोहचविण्यासाठी शिंदे यांनी मेहनत घेतली आहे. त्याचबरोबर गरीब कुटुंबातील रुग्णांना धर्मादाय आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत केलेली लाखो रुपयांची मदत ही एखाद्या आमदार, खासदारांनाही लाजवणारी आहे. या दोघांच्या व्यतिरिक्त माजी आमदार स्व. बाबुराव पाचर्णे यांचे चिरंजीव राहुल पाचर्णे यांच्या देखील नावाची तालुका अध्यक्ष पदासाठी चर्चा आहे. असं असलं तरी आबासाहेब सोनवणे यांच्या तालुकाध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण होत नाही आणि सोनवणे यांच्या कार्यप्रणालीवर वरिष्ठांमध्ये समाधानाचा सूर आहे त्यामुळे पुन्हा आबासाहेब सोनवणे यांच्याकडेच तालुकाध्यक्ष पदाची सूत्रे राहू शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही.
Add Comment