पाचूंदकर, पवार आंदोलनाच्या पवित्र्यात, चासकमानचे पाणी पुन्हा पेटले.
शिक्रापूर, पुणे | शिरुर तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान धरणाच्या पाणी वाटपावरून राजकीय हस्तक्षेप आणि शिरुर तालुक्यातीलच दोन भागात होणारा वाद नवीन नाही. जातेगाव खु, करंदी, शिक्रापूर, पिंपळे जगतापच्या ग्रामस्थांनी कोरोनाच्या काळात आंदोलन करत थेट पाण्यावर ताबा मिळवला होता. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा यावर्षी देखील शिक्रापूर, बुरुंजवाडी, जातेगाव बु, कोंढापुरी गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जानेवारी महिन्यापासून सुरू असलेले पाणी पूर्व भागात दिवसेंदिवस सुरूच होते, काल दि. २८ रोजी आवर्तन बंद करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेले शेतकऱ्यांनी आमच्या जमिनी प्रकल्पाच्या पुनर्वसनसाठी घेतल्या मात्र आम्हालाच पाण्यासाठी वणवण करावे लागत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
शिक्रापूर येथील शाखा कार्यालयात शिरुर बाजार समिती माजी सभापती प्रकाश पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांसह शिक्रापूर, बुरुंजवाडी, जातेगाव बु, कोंढापुरी येथील अनेक शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. वरिष्ठांशी संपर्क करून आमच्या चारी नंबर ११, १२, १३ आणि कोंढापुरीच्या तळ्याला पाणी मिळाल्याशिवाय आम्ही कार्यालय सोडणार नाही. अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावाखाली येऊन पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवलं असा सवाल अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी यावेळी विचारला.
कार्यालयात अधिकारी उपलब्ध नसल्याने शिरुर बाजार समिती माजी सभापती प्रकाश पवार यांनी एका अधिकाऱ्याला फोन लावून पाण्याबाबत विचारपूस केली यावर अधिकाऱ्यानेही माझ्यावर वरिष्ठांचा दबाव आहे, याबाबत मी उत्तर देऊ शकत नाही वरिष्ठांना विचारून कळवतो. असे सांगितल्याने प्रकाश पवार संतापले आणि अधिकाऱ्याला प्रतिप्रश्न करत “आम्ही कोणत्या पक्षात प्रवेश करू तुम्ही सांगा, पण आम्हाला पाणी द्या”. असा संतापजनक सवाल केला. दरम्यान शेखर पाचुंदकर यांनी देखील यावेळी बोलताना चासकमानचं पाणी जिथं शिरुर तालुक्यात प्रवेश करते त्याच गावांनाचा पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे. विनाकारण अतिरिक्त पाणी पूर्व भागाला दिले जाते, हा असमान न्याय एकाच तालुक्यात का होतो? पाणी वाटपात अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करतात? अधिकारी जर राजकीय दबावाखाली असतील तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. आमची पाणीपट्टी एक रुपयांची ही थकबाकी नसतानाही आमच्यावर अन्याय का.? नेहमीच पश्चिम भागावर अन्याय होणार असेल तर आम्ही पाण्यासाठी शांत बसणार नाही. अशा भावना पाचुंदकर यांनी व्यक्त केल्या.
आम्हाला आजच्या आज पाणी पाहिजे आम्ही शांत बसणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे शिक्रापूर येथील चासकमानच्या कार्यालयावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Add Comment