प्रगतीची ही प्रगती ऐकायला तीच नाही…..
“दादा, तुमची प्रगती पास झाली…. मात्र निकाल पहायला तीच नाही …” प्राचार्य अनिल शिंदे व पर्यवेक्षक किसन पांढरे यांनी प्रगतीच्या आई बाबांना प्रगती दहावीत पास झाल्याचे सांगितले आणि पलीकडून फक्त हंबरडा ऐकू आला. कारण हा निकाल ऐकायला प्रगती आता आहेच कुठे? ती तर केव्हाच देवाघरी निघून गेली.
कान्हूरच्या मेसाईच्या (ता. शिरुर) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १० वीच्या वर्गात शिकणारी प्रगती किसन गोरडे (रा. फलकेवाडी) ही एक अत्यंत सालस, गुणी विद्यार्थिनी. वर्गातही ती फारसी बोलत नसायची. आई वडिलांची परिस्थिती अत्यंत नाजूक. शेतमजुरी करून जगणारे साधे सरळ कुटुंब. त्यांना तिनही मुली. गरिबीचे चटके सोसत हसतखेळत प्रपंचाचा गाडा ओढणारे तिचे आई वडील. प्रगती सर्वात थोरली होती, त्यामुळे तिच्यावरच सारी भिस्त. प्रगतीला खूप शिकवायचे आणि तिला परिचारिका बनवायची असे तिचे वडील पालकसभेला आले की नेहमी शिक्षकांना सांगायचे. सर्व शिक्षकांनीही तिच्या गरीब परिस्थितीची जाणीव असल्याने मदतीचा हात पुढे केला. पण….. नियतीच्या मनात काही वेगळच होतं.
अभ्यास करून पास व्हायचं या निर्धाराने आपल्या गरीब आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून प्रगतीने अभ्यास केला, परीक्षा दिली. सर्व विषयांचे पेपर तिने हसत हसत लिहिले मात्र भूगोल विषयाचा पेपर बाकी होता. खेळताना दुर्दैवाने अपघात झाला आणि प्रगती मृत्युमुखी पडली. आईवडील प्रचंड दुःखात अजूनही आहेत. परिस्थिती नाजूक त्यात हे संकट, ग्रामस्थांनी धीर दिला. जिच्याबद्दल काही स्वप्न पाहिली होती ती सारी धुळीला मिळाली होती.
काल दहावीचा निकाल लागला, प्रगती एक पेपर देऊ शकली नाही. मात्र तरीही केवळ इतिहासाच्या पेपरमध्ये मिळालेल्या गुणांवर प्रगती पास झाली. शाळेचा निकाल १००% लागला. प्रगती गेली पण जाताना आपल्यामुळे शाळेचा निकाल कमी होणार नाही याची काळजी तिने घेतली असावी. प्रगतीचा निकाल तिच्या आईवडीलांना सांगताना प्राचार्य अनिल शिंदे यांनी आवर्जून सांगितले की, शाळेच्या शंभर टक्के निकालाच्या परंपरेचा लौकिक अबाधित ठेऊनच देवाघरी गेलेल्या प्रगतीला ७५. ४० टक्के इतके गुण मिळाले. सामाजिक शास्त्र विषयात एकूण ३८ गुण मिळाले कारण भूगोलाचा पेपर होण्यापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला . या दुःखी वातावरणामुळे शिक्षकांसह ग्रामस्थांच्या देखील डोळ्यात अश्रू आले.
Add Comment