पुणे राजकीय शिरूर

एकाच दिवशी पन्नास ग्रामस्थांचा वाढदिवस, सरपंच ताईंनी लढवली शक्कल..!


शिक्रापूर, पुणे | एखाद्या लोकप्रतिनिधीचं जेवढं लक्ष विकासकामांवर असतं अगदी तेवढंच लक्ष आपल्या मतदाराच्या वाढदिवसावर देखील असतं. एखाद्या मतदाराचा वाढदिवस असल्याने त्या व्यक्तीशी वाढदिवसाचे कारण साधून व्यक्तिगत संपर्क साधता येतो. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य ते आमदार, खासदार आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला हमखास शुभेच्छा देतात. पण एकाच दिवशी एकाच गावात पन्नास जणांचा वाढदिवस असेल तर शुभेच्छा द्यायच्या कशा ? गावच्या सरपंच ताईंनी यावर नामी शक्कल लढवली.


त्याचं झालं असं की, करंदी (ता. शिरुर) येथील सरपंच सोनाली किरण ढोकले या नेहमीप्रमाणे वाढदिवसाच्या शुभेच्छा गावातील ग्रामस्थांना देत होत्या. मात्र १ जून ही तारीख वाढदिवसासाठी प्रसिद्ध आहे. त्याची कारणे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहेत. वाढदिवस असणारे सर्व ग्रामस्थ जेष्ठ होते. कोणी ग्रामपंचायतचे आजी – माजी पदाधिकारी तर कोणी इतर संस्थेचे पदाधिकारी तर कोणी सर्वसामान्य शेतकरी, या सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सरपंच ताईंच्या मनात एक युक्ती सुचली. पती किरण उर्फ बंटी ढोकले यांच्या कानावर ही युक्ती घातली, त्यावर वाढदिवस असणाऱ्या सर्वांनाच एका मंदिरात बोलावून सर्वांना फेटे बांधून केक कपात जवळपास पन्नास ग्रामस्थांचा वाढदिवस साजरा करत एक अनोखा उपक्रम सरपंच दाम्पत्याने केला.


आमचाच वाढदिवस आम्हाला ठाऊक नाही, शाळेत शिक्षकांनी आम्हाला जो वाढदिवस दिला तोच आमचा वाढदिवस. आम्ही कुटुंबासोबत वाढदिवस अजून साजरा केला नाही मात्र सरपंच ताईंनी आमचा वाढदिवस साजरा केला ही खूप आनंदाची गोष्ट असल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. सरपंच सोनाली किरण ढोकले यांनी केलेल्या या उपक्रमाचे सर्वच जण कौतुक करत आहेत.

error: Copying content is not allowed!!!