पक्षाच्या बैठकीत पक्षांतर्गत नाराजीचा सूर.
शिक्रापूर, पुणे | शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नुकतीच बैठक पार पडली या बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार अशोक पवार उपस्थित होते. पक्षाने ज्यांना ज्यांना पदे दिली ते पक्षावर नाराज का आहेत ? पक्षाच्या बैठकीत का दिसत नाहीत ? याचा पक्षाने विचार करण्याची गरज आहे. असे मत शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी तळेगाव ढमढेरे येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत व्यक्त केले. त्यामुळे शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
शिरुर तालुका दोन विधानसभा मतदार संघात विभागला गेला असल्याने सगळ्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांची अडचण होत असते. केवळ विधानसभा निवडणुक वगळता सर्वच निवडणुका एकत्र लढविल्या जातात. राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्यावेळी शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक एकत्र अर्थात राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलच्या माध्यमातून लढविली असली तरी, अंतर्गत संवादाच्या अभावामुळे शेवटी वेगवेगळ्या चिन्हावर ही निवडणूक लढवावी लागली होती.
दरम्यान या बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या संचालक मंडळातील किती सदस्य पक्षाच्या या बैठकीला उपस्थित आहेत ? किंवा ज्यांना ज्यांना सभापती, उपसभापती पदाची संधी देण्याचा एकतर्फी निर्णय घेतला गेला, त्यापैकी किती जण या पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहिले. यावरही पक्षाने विचार केला पाहिजे. जर काही पदाधिकारी नाराज असतील तर ते का नाराज आहेत, आपल्या पातळीवर त्यांची नाराजी दूर होत नसेल तर अजित पवार यांच्यामार्फत ही नाराजी दूर केली जाऊ शकते. असा सल्लाच उपस्थित वरीष्ठ नेत्यांना बोलताना प्रकाश पवार यांनी दिला.
माजी सभापती शशिकांत दसगुडे, शंकर जांभळकर, काका कोरेकर, माजी उपसभापती विकास शिवले, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे या बैठकीत अनुपस्थित होते. त्याचबरोबर इतरही संस्थांवर पदाधिकारी राहिलेल्या अनेकांची अनुपस्थिती या बैठकीला प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे जर बैठकीत अनुपस्थित राहणारे नाराज असतील तर पक्षाने त्यांच्या नाराजीचा विचार करावा. निवडणुकीच्या काळात अनेकांना सोबत घेतले जाते, नंतर सोबत असलेले लोकं बाजुला जातात याचाही विचार व्हावा. असेही मत प्रकाश पवार यांनी व्यक्त केले.
प्रकाश पवार यांनी या बातमीला दुजोरा देत, ‘The बातमी’शी बोलताना सांगितले की, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पक्षाच्या पातळीवर मोठ्या ताकतीने लढवली गेली, मात्र या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काहीजण सहलीला निघून गेले. पक्षाच्या बैठकीला उपस्थित रहात नाही. असे काही लोक बाजूला का गेलेत किंवा नाराज आहेत का? असेल तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाच्या बैठकीत मी माझे मत व्यक्त केले आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाराजीचे नाट्य अडचणीचे ठरु शकते. त्यामुळे नाराज असलेल्या किंवा पक्षाच्या बैठका टाळणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर वेळीच उपचार करण्याची गरज राष्ट्रवादीतील वरीष्ठ नेत्यांनी ओळखली पाहिजे, अन्यथा आगामी निवडणुकांवर यांचे पडसाद उमटले जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Add Comment