राजकीय शिरूर

‘…म्हणून आम्ही उपस्थित नव्हतो’, अनुपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा खुलासा.


जांभळकरांचा पवारांवर प्रतिहल्ला.

शिरुर, पुणे | शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे पार पडली. या बैठकीत अनुपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी बोलताना पक्षाच्या वरीष्टांवरच नाराजी व्यक्त करत अनुपस्थितांवर निशाणा साधला होता.

या बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार अशोक पवार यांसह प्रदीप वळसे पाटील, बाळासाहेब नरके, शेखर पाचूंदकर, तालुकाध्यक्ष रवी काळे, मानसिंग पाचूंदकर त्याचबरोबर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ज्यांना ज्यांना पक्षाने तालुक्याच्या विविध संस्थांवर पदे दिली ते पदाधिकारी पक्षाच्या बैठकीला उपस्थित का राहत नाहीत ? ते नाराज आहेत का? याची चौकशी पक्षाने करावी असा प्रकाश पवार यांनी सल्ला दिला होता.

याबाबत ‘The बातमी’ने वृत्त प्रसारित केले होते. त्यावर अनुपस्थित पदाधिकाऱ्यांनी आम्हाला पक्षाच्या बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्याचा खुलासा केला आहे. त्याचबरोबर प्रकाश पवार यांनी अनुपस्थित राहीलेल्या शंकर जांभळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला होता की, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पक्षाच्या पातळीवर मोठ्या ताकतीने लढविली मात्र काहीजण प्रचारादरम्यान सहलीला निघून गेले होते.

त्यावर जांभळकर यांनी देखील प्रकाश पवार यांच्यावर प्रतिहल्ला करत ‘The बतमी’शी बोलताना सांगितले की, “मी भाजपा, शिवसेना किंवा जनता दल अशा कोणत्याही पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला नाही, तर माझा राजकीय जन्मच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झाला आहे. त्यामुळे माझ्या पक्ष निष्ठतेवर बोलणाऱ्यांनी अगोदर आपल्या २५-३० वर्षांच्या राजकीय कार्यकाळात पक्षवाढीसाठी किती मेळावे घेतले? किंवा किती पक्षप्रवेश घडवून आणले? याबद्दल माहिती द्यावी. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी पूर्ण केली आहे. राहिला विषय घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा तर निकाल बघितला की लक्षात येईल, मला जबाबदारी दिलेल्या बूथ वर किती मतदान मिळाले आणि आपल्याला जबाबदारी दिलेल्या बुथवर किती मतदान मिळाले याचे आत्मपरीक्षण करावे”.

दरम्यान एकेकाळी केंदूर – पाबळ गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी पवार आणि जांभळकर यांनी एकत्रित प्रचार केला. एवढंच काय तर शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही दोघांनीही बाजी मारली. मात्र आता जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होण्याअगोदरच दोघेही उमेदवारी मिळावी यासाठी रस्सीखेच करत आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येत असल्याने वरिष्ठ नेत्यांनी यात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षांतर्गत वाद मिटविण्यात वरिष्ठ नेते किती यशस्वी होतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

error: Copying content is not allowed!!!