पाऊस पडेना; पिकं करपली. नेते राजकारणात व्यस्त.
शिरुर, पुणे | अर्धा जुलै महिना उलटला आहे, पावसाने बळीराजाकडे पाठ फिरवली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. चासकमान धरणावर अवलंबून असलेल्या खेड आणि शिरुर तालुक्यातील शेतकरी किमान जनावरांना प्यायला तरी पाणी सोडा अशी कळकळीची मागणी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे करत आहेत.
शिरुर तालुक्यातील चासकमानच्या पाण्यावरून सातत्याने राजकारण होत असते, पूर्व आणि पश्चिम भाग असा वाद पाण्यासाठी सातत्याने होत असतो मात्र शिरूरचा शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. विहिरींनी तळ गाठला आहे तर छोटे- मोठे तळे देखील कोरडे ठाक पडले आहेत. पिकांनी माना टाकल्या आहेत. उसाच्या पिकाला जर पाणी मिळाले नाही तर एकाच उसाच्या पिकावर अवलंबून असलेला शेतकरी या वर्षी पुरता कोलमडून जाणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पेरणी तर दूरच मात्र तरकारी आणि पालेभाज्यांचे मळे नेस्तनाबूत होत आहेत. जनावरांसाठी लावलेला चारा देखील करपून चालला असल्याने करंदी, जातेगाव, मुखई, पिंपळे जगताप, वाजेवडी, धुमाळ पिंपळे, गणेगाव खालसा, बुरुंजवाडीसह शिक्रापूर परीसरातील गावं चासकमानच्या पाण्याकडे डोळे लावून बसले आहेत.
पाटबंधारे विभागाचे अधिकारी मात्र या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष करत आहेत, तर स्थानिक लोकप्रतिनिधी स्वतःच्या राजकारणात व्यस्त आहेत. पक्ष फुटीच्या गोंधळात काही नेते अडकून पडले आहेत, त्याचबरोबर कोणी मंत्रीपदासाठी देव पाण्यात ठेऊन आहे, तर कोणी चांगले खातं मिळावं या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या संकटाकडे कोणी लक्ष देणारा वाली उरला नाही अशी भावना स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहेत.
“अधिकाऱ्यांकडे यापूर्वीच अनेकदा आवर्तनाची मागणी केली आहे, मात्र अधिकारी एकावर एक कारण देऊन वेळ मारून नेत आहे.” – राजाभाऊ ढोकले (सदस्य – कालवा सल्लागार समिती)
“सर्वात मोठी अडचण जनावरांना पिण्यासाठी पाणी शिल्लक नाही, नेते मंडळी त्यांच्याच नादात आहेत, आमच्या पाणी प्रश्नाकडे कोणी लक्ष देणारा आहे की नाही हेच आम्हाला आता कळत नाही.” – बाबाजी कंद्रुप (चेअरमन – वि.वि.का.सो. करंदी)
Add Comment