आंबेगाव पुणे बारामती राजकीय शिरूर

मंचरला मला सभा घ्यायचीच आहे, तिकडे एक चक्कर मारली तरी बदल होईल, काळजी करू नका – शरद पवार

बारामती | राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, त्यापैकी शरद पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी देखील सहकार खात्याचं मंत्रिपद घेऊन भाजपच्या सोबतीचा रस्ता धरला. परंतु वळसे पाटील यांच्याच सोबतच्या काही सहकाऱ्यांनी शरद पवारांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व सर्व सहकाऱ्यांनी शरद पवार यांच्या बारामती येथील ‘गोविंद बाग’ या निवासस्थानी त्यांची भेट घेतली यावेळी आंबेगाव तालुक्यात एक सभा घेण्याची कार्यकर्त्यांनी विनंती केली त्यावर पवार यांनी सांगितले की, “मंचरला मला सभा घ्यायचीच आहे, आणि बदलाची काळजी करू नका मी एक चक्कर मारली तरी तुमच्याकडे बदल होईल”.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी दरम्यान वळसे पाटील यांच्यापासून दुरावलेले देवदत्त निकम यांनी आंबेगाव तालुक्यातील शरद पवार गटाचे नेतृत्व स्वीकारले आणि संपूर्ण आंबेगाव – शिरुर विधानसभा मतदारसंघात दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात वातावरण निर्मितीला बळ दिले आहे. त्याचबरोबर इकडे शिरूरच्या ४२ गावांत देखील वळसे पाटील यांचे एकेकाळीचे सहकारी शेखर पाचुंदकर यांनी देखील तीच वाट पकडली आहे. या दोघांनीही काल (दि. १४ ऑगस्ट) रोजी आपल्या कार्यकर्त्यांसह शरद पवार यांची भेट घेतली यावेळी शरद पवारांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मत जाणून घेत, शिरुर आणि आंबेगाव तालुक्यातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी सर्वसामान्य लोकांच्या मनात काय भावना आहेत हे जाणून घेताना टोमॅटो उत्पादक शेतकरी, बैलगाडा मालक, कांदा उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी सवांद साधला. दरम्यान शंकर जांभळकर, दामू घोडे, सनी थिटे, डॉ. प्रशांत दौंडकर, संतोष भोगावडे, रवी चौधरी, उत्तम सांबरे, नितीन पिंगळे, विनायक लोंढे, शहाजी डफळ यांसह अनेकांनी आपली मतं व्यक्त केली. शेखर पाचुंदकर यांनी बोलताना सांगितले की, डिंभे आणि चासकमान धरण साहेब आपल्यामुळे निर्माण झाले, औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या त्यामुळे या भागातील शेतकरी आपल्याला सोडून बाजूला जाणार नाही. तर देवदत्त निकम यांनी बोलताना सांगितले की, केंद्रातील मोदी सरकार हटवण्यासाठी साहेब तुम्हीच एक रामबाण औषध आहात, आपल्यातले भाजप बरोबर गेलेले लोकं विकासाचं नाव सांगून गेले असले तरी हे सगळं खोटं आहे, हे आता लोकांना समजलं आहे.

पितळी, दांडा मोडलेला कप, सारवलेल्या घराची आठवण.

दरम्यान पूर्वी बारामती लोकसभा मतदार संघात शिरुर तालुका देखील होता त्यावेळी खासदार असताना किंवा त्याच्या अगोदर शिरुर तालुक्यात आल्यानंतर पितळीतला गुळाचा चहा, दांडा मोडलेला कप, आणि सारवलेलं घर हे ठरलेलं होतं परंतु आता घरात बसायला खुर्ची मिळते, महिला ट्रेमध्ये चांगल्या कपबशीमध्ये चहा घेऊन येतात. शेतकऱ्यांची परिस्थिती बदलत आहे याचा आनंद होत असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की, भाजप बरोबर जाताना काही आमदार मला भेटले आणि मला भाजप बरोबर जावं लागेल असं सांगितलं त्यावेळी मी त्यांना स्पष्ट सांगितलं जर चुकीचं काही केलं नसेल तर भाजप सोबत जाण्याची गरज नाही. लोकांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करायची, लोकांनी भाजपकडे बघून तुम्हाला मते दिली नाही त्यामुळे लोकांना हे आवडलं नाही हे स्पष्ट आहे अशा शब्दांत वळसे पाटील यांच्यावर शरद पवार यांनी निशाणा साधला.

error: Copying content is not allowed!!!