जिथून आदेश दिला त्या सभागृहाचं नाव “शरद पवार सभागृह”
मंचर, पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाले, एक गट शरद पवार यांचा तर दुसरा अजित पवार यांचा. भाजप बरोबर गेलेल्या अजित पवार गटात यांच्या सामील होऊन दिलीप वळसे पाटील यांनी सहकार खातं मिळवलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जरी दोन गट पडले असले तरी अजित पवार गटातील नेते अद्याप आम्ही राष्ट्रवादी पक्षातच आहोत आमचाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असे जाहीर सभामध्ये सांगत आहेत.
तशाच प्रकारे दिलीप वळसे पाटील यांनी देखील काल (दि. २० ऑगस्ट) रोजी मंचर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यात थेट शरद पवार यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्यात एकदाही शरद पावरांनी स्वबळावर सत्ता स्थापन केली नाही. याऊलट दुसऱ्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांची उदाहरणे देऊन शरद पवार यांच्या नेतृत्वावर एकप्रकारे संशय व्यक्त केला आहे.
वास्तविक पाहता दिलीप वळसे पाटील यांना शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये असतानाच १९९० पासून उमेदवारी दिली ते आजपर्यंत शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली आमदार आहेत. या शिवाय त्यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, ऊर्जा मंत्री, वित्त व नियोजन मंत्री, गृहमंत्री, विधानसभा अध्यक्ष, उत्पादन शुल्क मंत्री, कामगार मंत्री यांसारख्या अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी ही शरद पवार यांनीच दिली असली तर आज शरद पवारांच्या भूमिकेशी विरोध पत्करून त्यांनी वेगळी वाट पकडली आहे.
दरम्यान मंचर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन दोन हजार नव्हे तर पाच हजार प्रतिज्ञापत्र तयार करण्याचे आदेश दिले आहेत. ते प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाला पाठवायचे आहे. पक्ष आणि पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार याचे भवितव्य त्या प्रतिज्ञापत्रावर अवलंबून असणार असल्याचे वळसे पाटील यांनी बोलताना अधोरेखित केले आहे. अर्थात शरद पवार यांनी उभा केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता अजित पवार गटाला मिळावा यासाठी हालचाली सुरू आहेत. त्या हालचाली दिलीप वळसे पाटील मंचर येथील ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहातून करत आहेत त्या सभागृहाचं नाव “शरद पवार सभागृह” आहे.
Add Comment