चर्चांना अधिक उधाण.
मंचर, पुणे | शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा आंबेगाव – शिरुर आणि शिरुर- हवेली विधानसभा मतदारसंघात विविध विकासकांमाच्या भूमिपूजन, उद्घाटनाचा नियोजित दौरा दि. २२ ते २५ ऑगस्ट पर्यंत ठरला होता. जुन्नर मधील आळे फाटा येथे काल दि. २२ रोजी कांद्याच्या आंदोलनानंतर शिरुर – हवेली मतदार संघात आमदार अशोक पवार समवेत शिरुरच्या पूर्व भागातील दौरा पूर्ण केला. दि. २३ अर्थात आजचाही हवेली तालुक्यातील नियोजित दौरा होतोय. परंतु दि. २४ व २५ रोजी आंबेगाव- शिरुर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या दौऱ्याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. तो मात्र दौरा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रद्द केला असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाल्यानंतर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे दोघेही एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या दौऱ्यावर अनेकांचे लक्ष लागून होते. परंतु खासदार डॉ. कोल्हे यांनी अचानक आंबेगाव – शिरुर विधानसभा मतदार संघातील दौरा रद्द केला आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शरद पवारांवर टीका केल्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या त्यानंतर वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलगिरी देखील व्यक्त केली. या प्रकरणामुळे राष्ट्रवादीमधील दोन्ही गटात तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे खासदार डॉ. कोल्हे यांनी वळसे पाटील यांच्यासोबत नियोजित दि. २४ व २५ रोजी होणाऱ्या दौऱ्याकडे पाठ फिरवली आहे. अचानक डॉ. कोल्हे यांनी हा दौरा रद्द केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार डॉ. कोल्हे हे दोघेही एकाच व्यासपीठावर आल्यावर नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते परंतु या दौऱ्यातून डॉ. कोल्हे यांनी सहभाग काढून घेतल्याने अधिक चर्चांना उधाण आले आहे.
Add Comment