आंबेगाव राजकीय शिरूर

राष्ट्रवादीचा एक गट पदाधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत.


अद्याप तालुकाध्यक्षच नाही.

मंचर, पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागल्यानंतर एकाच पक्षाचे अनेक कार्यकर्ते अजित पवार गटात सामील झाले तर काही जणांनी शरद पवार गटातच राहण्याचा निर्णय घेतला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाजन होऊन आता सहा महिने झाले. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी देखील सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. परंतु शिरुर – आंबेगाव विधानसभा मतदार संघातील अद्याप शरद पवार गटाचे पदाधिकारी ठरलेच नसल्याने दोन्ही गटातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटात सामील होऊन मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मतदार संघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात वळसे पाटील यांच्या भूमिकेबद्दल चर्चा सुरू झाली. त्यांच्या मतदार संघातील अर्थात शिरुर – आंबेगाव मधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील गोंधळात पडले होते परंतु इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचूंदकर यांनी वळसे पाटील यांचा मंत्रिपदाचा शपथविधी होताच फटाके फोडून आनंद साजरा केला होता. ज्या गटात दिलीप वळसे पाटील असतील त्याच गटात राहण्याचा निर्णय तात्काळ मानसिंग पाचूंदकर, प्रकाश पवार त्यापाठोपाठ माजी आमदार पोपटराव गावडे यांनी घेतला. दुसरीकडे वळसे पाटील यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळख असलेल्या देवदत्त निकम हे गेल्या काही महिन्यांपासून दुरावले होते, त्यामध्ये मंचर बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी डावलून देखील निकम निवडून आल्याने आणखीनच वळसे पाटील कुटुंब आणि निकम यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यामुळे देवदत्त निकम यांनी वळसे पाटील यांच्या विरोधी भूमिका घेत शरद पवार गटातच राहण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान शिरुर – आंबेगाव विधानसभा मतदार संघात पक्षाची जबाबदारी शरद पवारांनी निकम यांच्यावर सोपवली. निकम यांना पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीत सामील करून घेतले. दरम्यान पक्ष फुटीनंतर शरद पवार यांची जाहीर सभा आंबेगाव तालुक्यात होणार असा आग्रह देखील निकम यांनी धरला परंतु शरद पवार यांनी सांगितल्या प्रमाणे पवारांनी केवळ चक्कर मारली परंतु जाहीर सभा झालीच नाही. याउलट पक्षाच्या विभाजनानंतर मंत्री दिलीप वळसे पाटील यांचाच मतदारसंघात वावर वाढला आहे.

सात वेळा आमदार विविध खात्याचे मंत्री, राज्यातील राजकारणात महत्वाचे स्थान असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी मतदार संघात देखील आपला वचक कायम ठेवला आहे. एवढ्या बलाढ्य नेत्याच्या विरोधात भूमिका घ्यायला सहजासहजी कोणी तयार होईल अशी परिस्थिती नसतानाही देवदत्त निकम यांनी मात्र विरोधातील विडा उचलला आहे. असं असतानाही शरद पवार गटाला सहा महिने झाले मात्र अद्यापही शिरुर – आंबेगाव मतदार संघात पदाधिकारी मिळाले नाही. अर्थात पदाधिकारी निवडीची जबाबदारी ही देवदत्त निकम यांच्यावर असली तरी निकम यांनी या प्रक्रियेला दिरंगाई का लावली ? हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे. शरद पवार गटाच्या केवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा एकच पदाधिकारी नेमला आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटात असलेल्या शिरुर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी तात्काळ पदाधिकारी नियुक्ती करत संघटना मजबूत करण्यासाठी पाऊले उचलली आहेत.

दरम्यान शिरूरच्या कवठे यमाई येथे देवदत्त निकम यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला परंतु कार्यकर्त्यांची उपस्थिती हाच विषय चर्चेचा ठरला. दरम्यान पदाधिकारी नियुक्तीशिवाय पक्ष संघटना मजबूत होणार नाही आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याच्या विरोधात उभं राहायचं असेल तर मागे कार्यकर्त्यांचा संच असणे आवश्यक आहे हे देवदत्त निकम यांनी ओळखले असले तरी प्रत्यक्षात मात्र पक्ष बळकटीकरण करण्याची कुठलीच हालचाल निकम यांच्याकडून दिसत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित केला जात आहेत. कदाचित उद्या दोन्ही गट एकत्र आले तर आपली अडचण व्हायला नको या भीतीने दोन्ही बाजूने असलेले कार्यकर्ते पक्षाची जबाबदारी घ्यायला तयार होत नाहीत.

आगामी निवडणुकीची तयारी करण्यासाठी पक्ष मजबुत करण्याच्या सर्वच पक्षाच्या हालचाली सुरू आहेत नुकतीच राजगुरूनगर येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियान सुरू केले आहे. तर अजित पवार पदाधिकाऱ्यांना गाड्या देणार असल्याच्या बातम्याही झाल्या, तर इकडे भाजप देखील ‘मिशन शिरुर’ची जोरदार तयारी करत आहे. अशातच शिरुर – आंबेगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते अजूनतरी पदाधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

error: Copying content is not allowed!!!