पाचंगेंच्या उपोषणाचा निरोप घेऊन काळे मुंबईत.
मुंबई | घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा यावर्षीचा गळीत हंगाम सुरूच झाला नाही त्यामुळे शिरुर तालुक्यातील विशेषतः पूर्व भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस अडचणी निर्माण होत आहेत. कारखान्याची नेमकी परिस्थिती काय आहे हे सांगायला चेअरमन शेतकऱ्यांसमोर यायला तयार नाही. त्याचबरोबर कारखाना ताब्यात घेऊन प्रशासक नेमावा. कारखाना सुरू करण्यासाठी कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळ यांच्या आर्थिक व्यवहारांची, बॅंक खात्यांची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी करत भाजपच्या संजय पाचंगे यांनी उपोषण सुरू करून ८ दिवस होत आहेत.
घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. विशेषतः पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस गाळप होणे अपेक्षित असताना नोंदीची तारीख होऊनही ऊस अजूनही शेतातच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. कारखान्यातील कामगारांचे तब्बल १४ महिन्यांचे पगार थकलेले आहेत. पगार मिळत नसल्याने हतबल झालेल्या कामगारांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा देखील दिला आहे. तर दुसरीकडे शेतकरी सभासद देखील कारखान्याच्या या परिस्थितीमुळे कारखान्याच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. अशा स्थितीत भाजपच्या संजय पाचंगे यांनी कारखाना सरकारने ताब्यात घेऊन प्रशासक नेमावा अशी मागणी करत उपोषण सुरू केले आहे. हाच निरोप घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे शिरुर तालुकाध्यक्ष रवि काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली.
कारखान्याची सर्व परिस्थिती दादांसमोर मांडली, त्याचबरोबर शिरुर तालुक्याच्या पूर्व भागात कशा प्रकारे शेतकरी हतबल झाले आहेत आणि कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात गेल्यानंतर शेतकरी एकच प्रश्न विचारात “बापू कारखाना कधी सुरू होणार ? कारखान्याची नेमकी परिस्थिती काय आहे ?” मी कारखाण्याचा संचालक नसतानाही मला शेतकरी याबाबत प्रश्न विचारतात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे संकट मी दादांसमोर मांडले आहे. “दादा आमच्या शिरुर तालुक्याचा घोडगंगा वाचवा” अशी विनंतीच मी दादांना केली आहे, त्याचबरोबर संजय पाचंगेंचा निरोपही दादांना दिला आहे. दादा लवकरच यावर तोडगा काढण्यासाठी शासन पातळीवर हालचाली सुरू करणार असल्याचे मला अजितदादांनी आश्वासन दिले असल्याचे रवि काळे यांनी “The बतमी’शी” बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाजन झाल्यानंतर तात्काळ अजित पवार गटात रवि काळे यांनी सामील होण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिरुर तालुक्यातील अजित पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यांच्या यादीत काळे यांनी आपले नाव नोंदविले आहे.
दरम्यान २० हजार पेक्षा जास्त शेतकरी या घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर अवलंबून आहेत. कारखान्यात आर्थिक भ्रष्टाचार झाला आहे, या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी संजय पाचंगे यांनी लावून धरली आहे. पाचंगे यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे दरम्यानच्या काळात अनेक स्थानिक नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. कामगारांच्या पगाराचा प्रश्न देखील अत्यंत ज्वलंत आहे. त्यामुळे आगामी काळात कारखान्याच्या प्रश्नावर नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
Add Comment