राजकीय पुढाऱ्यांना व्यासपीठ मिळाले की स्वतः चा प्रचार करण्याची संधी मिळाली असं समजून माईकशी बिलगतात आणि परिस्थितीचं भान विसरून राजकीय भाषणं करतात. हे इतर कार्यक्रमांत ठीक होतं परंतु कितीही दुःखद प्रसंग असला तरीही हे राजकीय पुढारी भान विसरून आता दशक्रिया विधीमध्ये देखील स्वतःचाच प्रचार करताना दिसतात. असाच एक प्रसंग शिरुर तालुक्यात घडला. एक विधानसभेला इच्छुक असलेले उमेदवार आणि दुसरे इच्छुक झालेले उमेदवार यांच्यात भर दशक्रिया विधीमधेच कलगीतुरा पाहायला मिळाला.
त्याचं झालं असं की, शिरुर तालुक्यातील एका गावात दोन दिवसांपूर्वी एक दशक्रिया विधी पार पडला समाजातील सुपरिचित कुटुंब असल्याने या दशक्रिया विधीला मोठ्या संख्येने लोकं उपस्थित होते. अर्थात सर्वच पक्षाचे राजकीय पुढारी देखील उपस्थित होते. नामांकित प्रवचकार देखील लांबून बोलाविण्यात आले होते. प्रवचनात महाराजांनी राजकीय पुढाऱ्यांच्या दिनक्रमावर भाष्य केलं. राजकीय पुढाऱ्यांची कशाप्रकारे धावपळ सुरू असते त्याची माहिती महाराजांनी सांगितली. आता महाराजांनीच प्रवचनात आपली व्यथा मांडली असल्याने पुढारी देखील खुश झाले. शाब्दिक श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक राजकीय चेहरे समोर बसलेले दिसत होते. कधी कधी अशी बोलणाऱ्यांची जास्त गर्दी दिसली की पुढारी देखील इतर पुढाऱ्यांच्यात ‘मीच कसा भारी आहे’ हे दाखवण्यासाठी आपल्या भाषणात वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या कविता, इंग्रजी वाक्य, कविता त्याचबरोबर महाभारतातील उदाहरण रामायणात आणि रामायणातले महाभारतात, काल्पनिक घटना असा अनेक केविलवाणा प्रकार पुढारी मंडळी करत असतात.
आता प्रवचनात महाराजांनी पुढाऱ्यांची धावपळ सांगितली म्हटल्यावर समोर बोलणाऱ्यांची गर्दीचा अंदाज बघता एका विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पुढाऱ्याने आपल्याला आणखी कार्यक्रमांना जायचंय त्यामुळे सर्वात आधी मी शाब्दिक श्रद्धांजलीपर भाषण देऊन पुढे जाण्याचा पर्याय निवेदकला सुचवला आणि ते बोलायला लागले. महाराजांनी प्रवचनात उल्लेख केलेल्या पुढाऱ्यांच्या धावपळीचा धागा पकडून सांगितले त्यांनी सांगितले की, “अनेकांना तर कोणतीही निवडणूक लढवायची नसते तरीही ते पुढारी धावपळ करतात, अनेक कार्यक्रमांना दिसतात, आता इथेच समोर बसलेल्या तात्यांना (बदलले नाव) तर काय कोणतीही निवडणूक लढवायची नाही, तरी ते धावपळ करत असतात”. त्यावर तात्या लगेच खालून बोलले “तुम्हाला कोण म्हणलं मला निवडणूक लढवायची नाही ? मला देखील तुमच्यासारखीच विधानसभेची निवडणूक लढवायची इच्छा आहे, आणि तुम्ही ज्या मतदार संघातून लढणार त्याच मतदार संघातून मीही लढणार आहे”. असं तात्या म्हणताच खाली बसलेल्या लोकांनी हसून एकमेकांना टाळ्या दिल्या. जे विधानसभेचे इच्छुक उमेदवार भाषण करत होते त्यांची लागलीच पंचायत झाल्याने त्यांनी देखील समयसूचकता ओळखून तात्यांनाही निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आणि आपलं भाषण आटपून पुढच्या कार्यक्रमाला निघून गेले. मात्र मागे उरलेल्या श्रद्धांजलीपर भाषणांची देखील चर्चा चांगलीच रंगली.
अशा प्रकारे दशक्रिया विधीमध्ये देखील राजकीय पुढारी भान विसरून कधी विनोदी भाषणे करून एकमेकांना टाळ्या देत भाषणे करतात तर काहीजण आपापल्या पक्षाचा, स्वतःच्या उमेदवारीचा प्रचार करत दशक्रिया विधीला देखील राजकीय व्यासपीठ म्हणून बघतात. त्यामुळे खाली बसलेले सर्वसामान्य नागरिक मात्र यांच्या भाषणांना आणि राजकीय कुरघोड्यांना वैतागून म्हणतात “अरे इच्छुकांनो किमान दशक्रिया विधी तरी सोडा, इथेही सुरूच असतो तुमचाच प्रचार”. अनेक ठिकाणी अशा भाषणांवर बंदी यावी यासाठी प्रयत्न केले आहेत तर काही ठिकाणी यशस्वी झाले आहेत. त्यामुळे पुढाऱ्यांनी प्रसंगावधान ओळखून भाषणे करावी अन्यथा अशी फजिती होऊ शकते.
Add Comment