आंबेगाव ताज्या घडामोडी शिरूर

पवारांचा सांगावा घेऊन देवदत्त निकम गावागावात.

मंचरला होणार सभा, तयारीच्या बैठकांना उस्फुर्त प्रतिसाद.

पाबळ, पुणे | अजित पवारांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागला यामध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार गट आपलासा केला, परंतु मतदार संघात वळसे पाटील यांच्या विरोधात नाराजीचा सूर कायम आहे. हाच नाराजीचा सूर आणखी वाढविण्याची संधी देवदत्त निकम सोडत नाही. त्यातच आता वळसे पाटील यांच्या आंबेगाव – शिरुर विधानसभा मतदारसंघात मंचर याठिकाणी शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. याच सभेचे निमंत्रण देवदत्त निकम गावागावात जाऊन देत आहेत.

शरद पवार यांच्याकडून आता पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने बहाल केले आहे, त्यानंतर पहिलीच शरद पवार यांची जाहीर सभा मंचर याठिकाणी होणार आहे. या सभेत पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वळसे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयावर शरद पवार नाराजी व्यक्त करतात की यावर बोलणं टाळतात हे पाहणं देखील औत्सुक्याचे असणार आहे. शरद पवार यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून वळसे पाटील यांची ओळख होती परंतु अजित पवार यांच्या बरोबर जाण्याची भूमिका वळसे पाटील यांनी घेतल्याने मतदार संघात देखील कार्यकर्ते दोन गटात विभागले आहेत.

वळसे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शरद पवार गटाच्या विधानसभेच्या उमेदवारीची देवदत्त निकम यांना संधी चालून आली असली तरी त्या संधीचं सोनं करण्यासाठी निकम कोणकोणते प्रयोग करतात हे पुढचा काळच ठरवेल. आंबेगाव तालुक्यातील राजकीय परिस्थिती बघता गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील कार्यकर्ते, मतदार दोन गटात विभागले आहेत. एक म्हणजे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा गट तर दुसरा म्हणजे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा गट. यापूर्वीच्या अनेक निवडणुका या दोन गटातच झालेल्या आहेत. मतदार देखील अनेकदा मोठ्या फरकाने दोन्ही पैकी एका बाजूला बहुमत देताना पाहायला मिळाले आहेत. त्यामध्ये आता देवदत्त निकम यांच्या गटाची भर पडली आहे, येत्या काळात या नव्याने उदयास आलेल्या गटाचा आंबेगाव तालुक्याच्या राजकारणावर कसा प्रभाव पडतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

येत्या २१ तारखेला मंचर येथे होणाऱ्या शरद पवारांच्या सभेची देवदत्त निकम जोरदार तयारी करत आहेत. आत्तापर्यंत शिरूरच्या दोन जिल्हा परिषद गटातील गावागावात फिरून निकम यांनी शरद पवारांच्या सभेचे निमंत्रण दिले आहे. शिरूरच्या ३९ गावातील देखील जुन्या फळीतील कार्यकर्त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे निकम यांनी सांगितले. दरम्यान शिरूरच्या भागात दामू घोडे, शेखर पाचुंदकर, शंकर जांभळकर, सनी थिटे यांनी देखील होणाऱ्या सभेच्या तयारीत सहभाग नोंदवला आहे. या सभेसाठी तयारीच्या बैठकांनाच उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने अनेकांचे लक्ष लागून असलेल्या सभेच्या जोरदार तयारीची चर्चा आहे.

error: Copying content is not allowed!!!