आंबेगाव पुणे

दत्तू पाटलांच्यामध्ये जी निष्ठा होती त्यातील ५ टक्के निष्ठा सुद्धा याभागातील नेतृत्वाकडे नाही – शरद पवार

मंचरच्या सभेत वळसे पाटलांना घेरले.


मंचर, पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालं त्यानंतर अवघ्या काही महिन्यांवर लोकसभेची निवडणूक येऊन ठेपली असताना शरद पवार यांची मंचर येथे जाहीर सभा झाली या सभेत अनेकांनी आपली मतं व्यक्त केली. यावेळी शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी देवदत्त निकम यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली. यामध्ये वळसे पाटील यांच्या पूर्वीच्या वक्तव्यांची मालिका व्हिडीओद्वारे प्रदर्शित करत वळसे पाटलांच्या वक्तव्यांची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान वळसे पाटील यांनी अजित पवार गटात जाताना रोहित पवार यांना जबाबदार धरले होते, डिंभे धरणाच्या बोगद्याच्या संदर्भातील वळसे पाटील यांची यापूर्वीची नेमकी काय भूमिका होती याचा पुरावा दाखवत रोहित पवारांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

दरम्यान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील गावकरी, देव, मंदिर आणि पुजारी अर्थात मध्यस्थी याबाबतचे एक काल्पनिक उदाहरण देऊन वळसे पाटील यांना उद्देशून मंदिरातील पुजारी बदलण्याची वेळ आली असल्याचे संकेत दिले. यावेळी शिरुरच्या ४२ गावांच्या वतीने शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर यांनी देखील सरकारच्या धोरणांवर टीका करत राज्यात बदललेल्या परिस्थितीबाबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीवर भाष्य केले. ज्यांनी घर बांधलं त्यांनाच तुम्ही घराच्या बाहेर काढायला निघालात ? हे पाप फेडणार कुठे ? असा सवाल भर सभेत बोलताना उपस्थित केला. या सभेसाठी शंकर जांभळकर यांनी दामू घोडे, सनी थिटे यांच्या मदतीने शिरुरच्या ४२ गावांतून शरद पवार यांना मानणारा कार्यकर्त्यांचा गट सोबत घेऊन सभास्थळी जाताना उपस्थितींतांचे लक्ष वेधून घेतले.

दरम्यान शरद पवार यांनी बोलताना आंबेगाव तालुक्यातील जुन्या सहकाऱ्यांची आठवण करून दिली यामध्ये दत्तात्रय वळसे पाटील, विठ्ठलराव बाणखिले, बाबुराव बांगर यांसारखे अनेक सहकारी सोबत होते त्यांचे वैशिष्ट्य ही निष्ठा होती. पुढे पवार बोलताना म्हणाले की एका बाजूने दत्तू पाटलांनी निष्ठा दिली तर त्यांचा वारसा असणाऱ्यांनी काय केलं, त्यांना काय द्यायचं कमी ठेवलं होतं, विधानसभा दिली, विधानसभा अध्यक्ष केलं, अनेक खात्याचे मंत्री पद दिले, देशाच्या साखर महासंघाचे अध्यक्ष पद दिले, दत्तू पाटलांच्यामध्ये जी निष्ठा होती त्यातील पाच टक्के निष्ठा सुद्धा याभागातील नेतृत्वाकडे नाही. जी लोकं आमच्याशी निष्ठा ठेवत नाही ती लोकं निवडून देणाऱ्या नागरिकांशी पण निष्ठा ठेवणार नाही. आणि हे चित्र आपल्याला बदलावे लागेल. अशा प्रकारे वळसे पाटील यांचे नाव न घेता शरद पवार यांनी वळसे पाटलांवर निशाणा साधला

error: Copying content is not allowed!!!