पुणे राजकीय शिरूर

महायुती उमेदवार शोधात, डॉ. कोल्हे प्रचारात..!

पुणे | महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेला लोकसभा मतदार संघ म्हणजे शिरुर लोकसभा मतदार संघ. गेल्या पाच वर्षांत निवडून आल्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे मतदार संघात फिरलेच नाही असा विरोधी गटाकडून सातत्याने प्रचार केला अर्थात काही प्रमाणात हे वास्तव असले तरी त्याची कारणे अनेकदा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहीर केली आहेत. मतदार संघात असलेले बलाढ्य पारंपरिक आमदार आणि कार्यकर्त्यांवर असलेला त्यांचा दबाव यामुळे डॉ. कोल्हे यांना अडचण होणार हे नक्की होते.

दरम्यान शिरुर लोकसभा मतदार संघ अजित पवारांनी प्रतिष्ठेचा करूनही अजूनपर्यंत महायुतीला डॉ. कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार मिळाला नाही त्यामुळे जवळपास पुन्हा डॉ. कोल्हेच संसदेत जाणार अशा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तशी तयारी देखील खासदार डॉ. कोल्हे यांनी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गटाला “तुतारी वाजवणारा माणूस” हे चिन्ह मिळाले आहे, हे चिन्ह मतदार संघात तळागाळात पोहचविण्यासाठी डॉ. कोल्हे यांनी कंबर कसली आहे.

महामार्गाच्या दुतर्फा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराचे मोठे मोठे फ्लेक्स पाहायला मिळत आहे, त्यावर आवर्जून चिन्हाचा प्रचार प्रकर्षाने जाणवतो, त्यामुळे शरद पवार गटात असलेल्या नेत्यांपैकी डॉ. कोल्हे यांनीच चिन्हाचा सर्वाधिक प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. एवढंच काय तर सोशल मीडिया हे बलाढ्य साधन असले तरी ग्रामीण भागातही चिन्हाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर पासूनच प्रचाराची ‘डिजिटल व्हॅन’ ग्रामीण भागात फिरताना दिसत आहे.
सद्या तरी लोकसभेच्या जागा वाटप, उमेदवारी या सगळ्या गोंधळात पक्षाचे नेते असले तरी डॉ. कोल्हे मात्र मतदार संघाचा दौरा करताना दिसत आहे. डॉ. कोल्हे यांनी घेतलेली प्रचारातील आघाडी महायुतीची डोकेदुखी ठरणार आहे. अजित पवार यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडण्याचे आव्हान दिले आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष या मतदार संघावर लागून आहे.

डॉ. कोल्हे यांनी अजित पवारांचे आव्हान स्वीकारले आहे याशिवाय, अजित पवारांच्या बदल्यात शरद पवार यांना पक्षाला नवा युवा चेहरा मिळाला आहे. अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके यांना शरद पवार गटात खेचून आणण्याचे काम डॉ. कोल्हे यांनी केले असल्याने अजित पवार आणखी दुखावले आल्याचे बोलले जाते. डॉ. कोल्हे यांच्या प्रचाराची सुरू असलेली जोरदार तयारी लक्षणीय आहे. त्यामुळे सर्वाधिक चर्चेत असलेला मतदार संघात आणखी बऱ्याच हालचाली होणार आहेत.

error: Copying content is not allowed!!!