शिरुर, पुणे | एखाद्या कार्यक्रमाला जर गर्दी असेल तरच नेते मंडळी या गर्दीच्या कार्यक्रमात उपस्थिती दाखवतात. मग तो कार्यक्रम लग्न असो, दशक्रिया असो, किंवा बैलगाडा घाट. जर गर्दी असेल किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या कुटुंबातील कार्यक्रम असेल तरच त्या ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांची रेलचेल पाहायला मिळते. आणि मग या गर्दीचा फायदा घेऊन पुढील निवडणुकीचा प्रचार डोक्यात ठेऊन वक्तव्य करण्याची पुढाऱ्यांना घाई असते. अशी एकंदरीत परिस्थिती पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात पाहायला मिळत आहे.
दशक्रिया घाट आणि बैलगाडा घाट या दोन्हीही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि याच गर्दीत आपला संदेश भाषणातून पोहचवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांचा सद्या खटाटोप पाहायला मिळतो. या पुढे एकामागून एक निवडणुकांचे सत्र पाहायला मिळणार आहे. लोकसभा, विधानसभा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असणार आहेत. त्या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी आणि आपण निवडून यावा यासाठी अनेकजण वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरतात.
असाच एक प्रकार एका बैलगाडा घाटात पाहायला मिळाला. दशक्रिया घाटात राजकीय भाषणे नको यासाठी अनेकांनी प्रबोधन केले मात्र त्याचा काहीही उपयोग आजतागायत झाला नाही. आता बैलगाडा घाटात देखील तुडुंब गर्दी पाहायला मिळते आणि याच गर्दीत आपली राजकीय भाषणे ठोकण्याचा अनेकांचा मनसुबा असतो. त्याच हेतूने एका निवडणुकीसाठी इच्छुक असेलेला एक नेता बैलगाडा घाटात पोहचला असावा. दरम्यान काही दिवसांपूर्वी बैलगाडा घाटात एका मोठ्या नेत्याला लोकांच्या विरोधाला सामोरे जावं लागलं होतं. त्यामुळे घाटातील निवेदक मंडळी राजकीय भाषणांना आवर घालण्याचा प्रयत्न करतात. तसाच प्रयत्न या दरम्यान एका हुशार निवेदकानेही केला. इच्छुक नेता आता माईक घेऊन बोलणार तोच समोरून निवेदकाने सांगितलं की “हे साहेब एक बैलगाडा मालक आहेत त्यांना माहीत आहे घाटात कितीवेळ बोलायचं”. आता इच्छुक नेत्यालाही वाटलं असावं की आपलं भाषण आता आखुडच घ्यावं लागणार आहे, त्यामुळे या नेत्याने देखील बैलगाडा मालकांचं एक उदाहरण अप्रत्यक्ष राजकीय परिस्थितीला जोडून सांगण्याचा प्रयत्न केला आणि भाषण आटोपते घेऊन माईक बाजूला केला.
माईक बाजूला केला खरं पण, तिथं उपस्थित असलेले आणि या इच्छुक नेत्यांचे एक स्थानिक मित्र आणि माजी सरपंच यांनी मात्र ही संधी दवडता कामा नये म्हणून माईक घेऊन गाडा शौकिनांना सांगायला सुरुवात केली की, हा घाट या इच्छुक नेत्यांच्या मदतीने कसा पूर्ण झाला आहे, आणि कोण हा बैलगाडा घाट होण्यास अडथळा करत होते. आता हे सगळं नाट्य घडत असताना विध्यमान सरपंचाच्या मुलाला हा केविलवाणा प्रकार अयोग्य वाटला असावा म्हणून समयसूचकता ओळखुन इथे राजकीय भाषणे नकोत म्हणून माईक बंद करण्याची विनंती त्याने केली, आपल्याला पुढे अडचण नको म्हणून उपस्थित या इच्छुक नेत्याने मोठेपणा दाखवत मित्राच्या हातातील माईक घाईघाईने ओढून घेत संयोजकांकडे स्वाधीन केला.
या दरम्यान उपस्थित बैलगाडा शौकिनांनी नाराजी व्यक्त केली. या राजकीय पुढाऱ्यांना दशक्रिया घाट आणि बैलगाडा घाट हा राजकीय अड्डा बनला असल्याने या दोन्ही घाटात राजकीय भाषणांच्या माध्यमातून समोरच्या नेत्यापेक्षा मी कसा भारी हे दाखवण्याची घाई स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे दशक्रिया घाट आणि बैलगाडा घाटातील राजकीय पुढाऱ्यांची भाषणे थांबवावी अशी अनेकजण विनंती करत आहेत.
Add Comment