पुणे | शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांनी भाजपला जवळ केल्यानंतर शरद पवारांच्या पक्षात मातब्बर नेते शिल्लक राहिले नाही. मोठे मोठे नेते अजित पवारांच्या गटात सामील झाले. जयंत पाटील वगळता शरद पवारांचा पक्ष वाढविण्यासाठी महाराष्ट्राची ओळख असलेला दुसरा मोठा नेता नाही. यातूनही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे स्टार प्रचारक खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना आता पाडण्याचा विडा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उचलला असल्याने डॉ. कोल्हे यांना देखील मतदार संघातच अडकवून ठेवण्याचा डाव अजित पवारांनी आखला असला तरी अधुन- मधून डॉ. कोल्हे याला छेद देताना पाहायला मिळत आहेत.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी आंबेगाव तालुक्यातील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी हजेरी लावली अर्थात मोठी सभा देखील घेतली आणि या सभेत खासदार डॉ. कोल्हे यांच्यावर सडकून टीकाही केली. त्यानंतर काही दिवसांतच डॉ. कोल्हे यांच्या पुढाकाराने अजित पवारांच्या गटात असलेले आमदार निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. दरम्यान अजित पवारांच्या हातातून डॉ. अमोल कोल्हे यांनी एक आमदार हिसकावून नेला आणि अजित पवार काहीही करू शकले नाही अशा चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाल्या. अजित पवार परवा पुन्हा आंबेगाव तालुक्यात आले आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश देऊन डॉ. कोल्हे यांच्या विरोधात उमेदवारी दिली.
दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील बलाढ्य घराणे म्हणून ओळख असलेल्या आणि माजी उपमुख्यमंत्री राहिलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांची काल डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट घेतली. २०१९ साली राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले मोहिते पाटील कुटुंब शरद पवारांच्या सोबत उभे राहणार असल्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील फोनवरून मोहिते पाटील कुटुंबाशी चर्चा झाली असल्याची कबुली देखील जयसिंग मोहिते पाटील यांनी दिली. इकडे रणजितसिंह मोहिते पाटील यांचा ओढा जरी भाजपकडे असला तरी त्यांची समजूत काढण्यात येत आहे. यामध्ये काल डॉ. अमोल कोल्हे यांनी आवर्जून मोहिते पाटील कुटुंबाची भेट घेतल्याने आणखीनच चर्चांना उधाण आले आहे.
१५ वर्ष खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील आणि अभिनेता असलेले डॉ. अमोल कोल्हे यांच्यात २०१९ मध्ये झालेल्या लढतीत डॉ. कोल्हे यांनी बाजी मारली. पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डॉ. अमोल कोल्हे यांचा वापर शिवस्वराज्य यात्रेतून संपूर्ण महाराष्ट्रभर केला, त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिक आमदार निवडून येण्यास मदत झाली. डॉ. कोल्हे यांच्या लोकप्रियतेचा फायदा पक्षाला होताना दिसतो. आता ५ वर्षे खासदार राहिल्यानंतर राजकारण आणखी जवळून अनुभवल्यानंतर डॉ. कोल्हे शरद पवारांच्या मदतीला येताना दिसतात. सुरुवातीला निलेश लंके आणि आता थेट विजयसिंह मोहिते पाटील यांना शरद पवारांकडे वळविण्याचे काम डॉ. कोल्हे करत असलेले दिसतात. पर्यायाने माजी खासदार आढळराव आणि डॉ. कोल्हे यांच्यात राजकीय दृष्ट्या तुलना केली तर स्वपक्षाला अधिक फायदा डॉ. कोल्हे यांच्यामुळे होताना दिसतो. आढळराव पाटील खासदार असताना मतदारसंघातील आमदार कधीही निवडून आणता आले नाही असा ठपका आढळराव पाटील यांच्यावर अनेकदा ठेवला जातो.
अशीच शरद पवारांची ताकद वाढविण्याचे काम खासदार डॉ. अमोल कोल्हे सातत्याने करताना दिसले तर अजित पवारांची डोकेदुखी वाढणार आहे. डॉ. कोल्हेंना मतदार संघातच रोखून ठेवण्यासाठी अजित पवारांना नवीन खेळी करावी लागणार हे मात्र नक्की.
Add Comment