मातब्बर नेत्यांच्या भागातील चित्र, वाचा सविस्तर
शिरुर | शिंदे सरकारमधील सहकार मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिल्या फळीतील नेते दिलीप वळसे पाटील यांचे त्यांच्या मतदारसंघावर १९९० पासून निर्विवाद वर्चस्व आहे. शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे गेलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील त्याच आंबेगाव तालुक्यातून येतात. वळसे पाटील यांची पकड असलेल्या विधानसभा मतदारसंघातील आंबेगाव तालुक्यातून आढळराव पाटील यांना ४ हजार २६३ मतांची आघाडी मिळाली खरी परंतु आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या शिरूरच्या ४२ गावांतून मात्र चार पटीने अधिक म्हणजेच १६ हजार २१३ मतांची आघाडी प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले डॉ. अमोल कोल्हे यांना मिळाली. त्यामुळे आढळराव पाटील यांना वळसे पाटील नेतृत्व करत असलेल्या आंबेगाव – शिरुर विधानसभा मतदारसंघातून मतदानात पिछाडी मिळाली आहे.
अगदी निवडणुकीच्या तोंडावर आढळराव पाटील यांनी उमेदवारीसाठी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर सोपविली. परंतु दुर्दैवाने वळसे पाटील यांचा घरातच किरकोळ अपघात झाला आणि पायाला व हाताला इजा झाल्याने निवडणूक काळात वळसे पाटील मतदारसंघात फिरू शकले नाही. त्याचा मोठा फटका आढळराव पाटील यांच्या निवडणुकीला पडलेला पाहायला मिळाला. आंबेगाव- शिरुर विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख ९० हजार १७९ मतदान झाले पैकी आंबेगाव तालुक्यातून तब्बल १ लाख २० हजार ७८३ मतदान झाले. यातून ४ हजार २६३ मतांची आघाडी आढळराव पाटील यांना मिळाली तर शिरूरच्या ४२ गावांमध्ये केवळ ६९ हजार ३९४ इतके मतदान झाले. यातून तब्बल १६ हजार २१३ मतांची आघाडी विजयी उमेदवार डॉ. कोल्हे यांना मिळाली. हा डॉ. कोल्हेंना मिळालेला मताधिक्याचा आकडा मंत्री वळसे पाटील यांना भविष्यातील निवडणुकांचा विचार करायला लावणारा आहे.
शिरूरच्या ४२ गावांत ३ जिल्हा परिषद गट आहेत, या तीनही जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असल्यापासूनच या तीनही जिल्हा परिषद गटात पक्षांतर्गत धुसपूस चालूच होती. पक्षात फूट पडली आणि ज्यांना पक्षात अस्वस्थता वाटत होती त्यांना चालून संधी मिळाली. राष्ट्रवादी पक्षाच्या विभाजनात अनेकांना फायदा तर काहींना त्याचा तोटा सहन करावा लागला. विशेषतः टाकळी हाजी – कवठे गट आणि रांजणगाव – कारेगाव जिल्हा परिषद गट याबाबतीत अनेकदा चर्चेत राहिला आहे.
कोणाच्या गटात, कोणाची आघाडी…!
टाकळी हाजी – कवठे जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीच्या डॉ. कोल्हेंना दामू घोडे, प्रभाकर गावडे, राम गावडे, अरुणा घोडे, गणेश जामदार, पांडुरंग थोरात या स्थानिक नेत्यांनी ताकद लावली. गटात झालेल्या एकूण २६ हजार मतदानापैकी डॉ. कोल्हे यांना ७ हजार ४०३ मतांची आघाडी केवळ एकट्या टाकळी हाजी – कवठे गटातून मिळाली. या गटामध्ये माजी आमदार पोपटराव गावडे विरुद्ध दामू घोडे हा संघर्ष गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या निवडणुकांमध्ये सातत्याने पाहायला मिळत आहे. तर महायुतीच्या आढळराव पाटलांसाठी माजी आमदार पोपटराव गावडे, राजेंद्र गावडे, डॉ. सुभाष पोकळे, बाळासाहेब डांगे, योगेश थोरात, बाळासाहेब भोर, विलास थोरात यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
केंदूर – पाबळ जिल्हा परिषद गटातही महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कोल्हे यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज तुटपुंजी होती. या उलट आढळराव पाटलांसाठी मात्र मातब्बर नेत्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली होती. माजी सभापती प्रकाश पवार, माजी जि. प. सदस्य सविता बगाटे, जिल्हा दूध सं. मा. अध्यक्ष केशरताई पवार, राष्ट्रवादी यु. कॉ. ता. अध्यक्ष अमोल जगताप, प्रमोद पऱ्हाड, माजी जि. प. सदस्य जयश्री पलांडे, सदाशिव पवार, रवी गायकवाड, सोपान जाधव, बंटी ढोकले यांसारखे अनेकजण आढळराव पाटलांच्या मताधिक्याचा दावा करत होते. विशेष म्हणजे मंगलदास बांदल यांनी देखील या भागातील महत्वाच्या कार्यकर्त्यांना थेट संपर्क करून आढळराव पाटील यांच्यासाठी ताकद लावली होती. या उलट मात्र डॉ. कोल्हे यांच्याकडे शेतकरी आक्रोश मोर्चात हिरहिरीने सहभागी झालेले सनी थिटे, माजी सभापती शंकर जांभळकर, सामूहिक विवाह सोहळ्याचे जनक विकास गायकवाड या तिघांनी या गटात डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचा जोर कायम ठेवला. यामध्ये गटात झालेल्या २१ हजार २७५ मतांपैकी ४ हजार ४४ मतांची आघाडी मात्र डॉ. कोल्हे यांना मिळाली.
रांजणगाव – कारेगाव जिल्हा परिषद गटाकडे अनेकांचे लक्ष लागून होते. या गटात नेमकी आघाडी कोणाला मिळणार याबाबत सातत्याने चर्चा होत होती. कार्यकर्त्यांचा मोठा संच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष शिरुरचे (४२ गावं) अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांचा या गटात करिष्मा चालणार की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष शिरुरचे (४२ गावं) अध्यक्ष शेखर पाचुंदकर यांची प्रतिष्ठा कामी येणार, याबाबत सातत्याने चर्चा होत होती. दोन्ही पक्षाचे अध्यक्ष एकाच गटातील, एकाच गावातील असल्याने अनेकांचे या दोघांच्या गावात झालेल्या मतांकडे देखील लक्ष लागून होते. त्याचबरोबर शिवसेनेचे बापू शिंदे आढळराव पाटलांसाठी प्रयत्न करत होते तर इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संदीप शिंदे डॉ. कोल्हेंच्या प्रचारात सहभागी होते. दरम्यान एकूण या गटात झालेल्या २२ हजार १०९ मतांमध्ये डॉ. कोल्हे यांना ४ हजार ७६६ मतांची आघाडी मिळाली.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत वळसे पाटील परिवारातील तिसऱ्या पिढीतील सदस्य प्रकर्षाने सहभागी झालेले पाहायला मिळाले. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अनुपस्थितीत सुरुवातीच्या काळात कन्या पूर्वा, पुतणे विवेक आणि प्रदीप यांचा या निवडणुकीत मोठा सहभाग पाहायला मिळाला. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांचा ४२ गावांत मोठा वावर होता. तीनही जिल्हा परिषद गटात प्रदीप वळसे पाटील प्रचाराच्या प्रमुखस्थानी होते.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी The बातमीशी बोलताना सांगितले की, “आंबेगाव तालुक्यातून आमच्या महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आघाडी मिळाली आहे. शिरूरच्या ४२ गावांतून जरी पिछाडी मिळाली असली तरी त्या भागातील कारणे मला सांगता येणार नाही. त्या भागातील पक्षाची जबाबदारी मानसिंग पाचुंदकर यांच्याकडे आहे”. यावर पाचुंदकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “मी अमेरिकेत आहे आल्यावर यावर सविस्तर बोलू”. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष शेखर पाचुंदकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “शेतकरी, बेरोजगार यांची पिळवणूक केंद्र सरकारने केली, शेतकरी आक्रोश मोर्चातून डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या न्याय, हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढाई केली, ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शरद पवार साहेबांना ही अमूल्य भेट दिली आहे. गेली कित्येक दशके राजकीय साम्राज्य उभं केलेल्या प्रस्थापितांनी एक लाखाचे लीड देणार म्हणून सांगितले होते परंतु पैशाचा वापर आणि दडपशाहीच्या विरोधात सर्वसामान्य जनतेने कौल दिला आहे.”
लोकसभा निवडणुकीत मंत्री दिलीप वळसे पाटील स्वतः सहभागी होऊ शकले नसले तरी मतदारसंघात येऊन त्यांनी पुन्हा आपले पाय घट्ट रोवायला सुरुवात केली आहे त्यामुळे आगामी निवडणूकीत कोणाची बाजू भक्कम असणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
Add Comment