आंबेगाव : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे अधिकृत उमेदवार देवदत्त निकम यांनी ( दि. २८.१०.२०२४ ) रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोनही उमेदवारांनी मंचर येथे सभा घेण्यात आली असून निकम यांच्या सभेला शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थिती लावली, तर वळसे पाटील यांच्या सभेला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपस्थिती लावली होती.
महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिलेले आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत फूट पडली आणि काका पुतण्या राजकीय दृष्टया विभक्त झाले. या राजकीय घडामोडीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि एकेकाळी वळसे पाटील यांच्या सोबत असणारे देवदत्त निकम यांनी आंबेगाव-शिरूर येथे शरद पवारांची राष्ट्रवादी हातात घेतली. आता विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील आणि निकम या दोघांनी पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सभा घेऊन शक्ती प्रदर्शन केले आहे. या शक्ती प्रदर्शनात मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली आणि सभेत कार्यकर्त्यांचा उत्साह निवडणुकीच्या सुरुवातीला उंचावला होता.
एकीकडे वळसे पाटील यांनी सभेत केलेल्या विकास कामे, विविध सरकारी योजना यावर अधिक भर देऊन विरोधकांवर बोलण्यास टाळले आहे. मात्र दुसरीकडे निकम यांनी वळसे पाटील यांच्यावर टीका केली आहे. दोन्ही नेत्यांनी सभा घेत घोडेगाव येथे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेचे मतदान होणार आहे. त्यामुळे दिवाळी जरी सुरू झाली असली तरी देखील राजकीय फटाके मात्र जोरात फुटणार आहे. परंतु वळसे पाटील आणि निकम यांच्यात होणारी लढत ही तुल्यबळ असून जनता कोणाच्या पारड्यात आपले मताधिक्य जास्त टाकते हे येत्या २३ नोव्हेंबर रोजी करणार आहे.
Add Comment