बारामती : या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हे सरकार स्थापन झाल्यावर रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे. त्यामुळे शिरुरकरांनो घोडगंगा कारखान्याची कसलीच काळजी करू नका. कारखाना कसा सुरु होत नाही,तेच मी पाहतो. असा ठाम विश्वास शरद पवार यांनी शिरुर करांना दिला.
माळेगाव ( ता. बारामती ) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या गोविंद बाग येथील निवासस्थानी महाविकास आघाडीचे शिरूर हवेलीचे उमेदवार व आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून शिरूर हवेलीतील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, शिरूर तालुक्याचा सर्वोत्तम विकास करण्यासाठी व येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आशिया खंडातील सर्वोत्तम औद्योगिक वसाहत मी शिरूर तालुक्यात आणली. शेतीला मुबलक पाणी मिळण्यासाठी डिंभे आणि चासकमानचे पाणी शिरुर तालुक्यात आणले. त्यात अशोक पवारांच्या विकासकामांच्या जोरावर तालुका आज प्रगतीपथात आघाडीवर आहे. सध्या विरोधकांकडे आरोपांसाठी फक्त “घोडगंगा” हेच एकमेव हत्यार आहे. मात्र तुम्ही याची काळजी करू नका. मी घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करूनच दाखवतो.
यावेळी कृषी आणि पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिरूर तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, हवेलीचे तालुकाध्यक्ष संदीप गोते, सुलभा उबाळे, राजेंद्र सातव, प्रदिप कंद, सतीष कोळपे, सुभाष कोळपे , अतुल बेंद्रे, सोमनाथ बेंद्रे यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
तालुक्यात मलिदा गॅंग सक्रिय : शिरुर तालुक्यातील विकास कामांना दृष्ट लावण्यासाठी तालुक्यात मलिदा गॅंग सक्रिय झाली आहे. ही मलिदा गॅंग फक्त स्वतः चे राजकीय , स्वतः च्या व्यवसायांचे अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधकांना जाऊन मिळाली आहे. यांच्याकडे सर्वसामान्य जनतेसाठी कसलेही विकासाचे व्हिजन नाही. ही मलिदा गॅंग गावोगावी जाऊन तरुणांनचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा गॅंग पासुन तरुणांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन महाविकास आघाडीचे शिरूर हवेलीचे उमेदवार अशोक पवार यांनी केले.
शरद पवारांनी उधळली स्तुतीसुमने : राजकीय जीवनात वैयक्तिक आयुष्यापेक्षा समाजहितासाठी समाजसेवेला वाहुन घ्यावे लागते. आमदार अशोक पवारांनी ज्या प्रकारे शिरुर हवेलीच्या सार्वांगिण विकासाचा आलेख उंचावला आहे, तो दखलपात्र आहे. ज्या राजकीय पुढाऱ्यांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता सक्रिय असते तोच खरा नेता असतो. आज ज्या प्रकारे शिरूर हवेलीची जनता अशोक पवारांच्या पाठीशी ठामपणे , निष्ठेने, आणि विश्वासाने उभी आहे, ते पाहून अशोक पवार हे खर्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते आहेत , हेच अधोरेखित होते, अशी स्तुती सुमने शरद पवार यांनी अशोक पवारांच्या वर उधळली.
Add Comment