ताज्या घडामोडी राजकीय शिरूर हवेली

शिरूर हवेली | महायुतीतील बंड अखेर थंड !

शिरूर : महायुतीचे बंड आज शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात थंड झाले आहे. महायुती असलेले प्रदीप कंद आणि शांताराम कटके यांनी आज (०४ नोव्हेंबर) रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके विरुध्द महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे उमेदवार अशोक पवार अशी प्रामुख्याने लढत पहायला मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात आमदार अशोक पवार (शरदचंद्र पवार ), ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके ( अजित पवार ), शांताराम कटके ( अजित पवार ) आणि प्रदीप कंद ( भाजप ) असे प्रामुख्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अशोक पवार यांच्या विरोधात नक्की कोण उमेदवार असणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. कटके यांना अधिकृत उमेदवारी मिळाल्याने कंद आणि शांताराम कटके यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे हे बंड शमणार की आणखी प्रखर होणार याची उत्सुकता सर्वांना होती. मात्र आज (०४ नोव्हेंबर ) महायतीचा धर्म पाळत दोघांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंद यांची नाराजी दूर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. तसेच राष्ट्रवादीत असलेले शांताराम कटके यांनी देखील वरिष्ठांचा आदेश पाळला आहे. दरम्यान अजित पवारांच्या अस्तित्वाची ही लढाई असल्याने या जागेसाठी महायुतीला बंडाला पूर्णविराम मिळाला आहे.

दोन वेळी आमदार असलेले पवार यांचा मतदारसंघात असलेला दांडगा जनसंपर्क आणि विविध निधीतून केलेला विकास यामुळे कटके यांना ही निवडणूक सोपी असणार नाही. परंतु महायुतीत झालेली एकी अशोक पवारांना देखील ही निवडणूक सोपी असणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिरूर येथे भर सभेत शरद पवारांनी अशोक पवारांना मंत्री पदाचा शब्द दिला आहे. मात्र त्याच दरम्यान, शिरूर येथे महायुतीच्या सभेत अजित पवार यांनी ‘मंत्री व्हायला निघाला, तू आमदार कसा होतो ‘ असा थेट दम दिला आहे. त्यामुळे शिरूर येथील जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र आता याचा फटका कटके यांना बसणार की, आमदार अशोक पवार तिसऱ्यांदा आमदार होणार यासाठी येणाऱ्या २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

error: Copying content is not allowed!!!