मांडवगण फराटा, शिरूर : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांचे चिरंजीव व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिराज अशोक पवार यांच्या अपहरण, मारहाण आणि विवस्त्र प्रकरणामुळे शिरूर तालुक्यात मोठी अशांतता पसरली आहे. याच संदर्भात वकील असीम सरोदे यांनी पुण्यात पत्रकार परिषद देखील घेतली असून ऋषीराज पवार यांनी व्हिडिओच्या माध्यमातून घडलेली घटना कथन केली आहे. परंतु या घटनेत नवीन ट्विस्ट समोर येण्याची शक्यता आहे. ते वाघोली कनेक्शन…
ऋषी राज पवार यांनी केलेलं कथन…!ऋषिराज पवार यांनी सांगितले की, भाऊ कोळपे हा दिवसभर आमच्या प्रचारात फिरला. मी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याला माझ्या गाडीत बसवले. आमची गाडी मांडवगण वडगाव पर्यंत नेली असता तिथून पुढं चारचाकी गाडी जाणार नाही असे कोळपे याने सांगितले. तिथं कोळपेच्या मित्रांच्या दोन दुचाकी आलेल्या होत्या. कच्च्या रस्त्यातून बंगल्यापर्यंत दुचाकी नेण्यात आल्या. बंगल्यात नेण्यात आलं, तिथं एकांतात चर्चा करायची आहे असं सांगत रुममध्ये बोलावण्यात आले. भाऊ कोळपे आणि त्यांच्या दोन मित्रांनी दरवाजा बंद केला. एक बेड होता, तिथं बसवलं, दोघांनी हात पाय पकडले, त्यांच्यापैकी एकानं शर्टची बटणं उघडायला सुरुवात केली. मी त्याला विरोध केल्यानंतर धक्काबुक्की करायला लागले. यावेळी पैशासाठी हे सगळं करत असाल तर करु असे मी त्यांना सांगितले. पण, तिथं पडलेलं कापड घेतलं, माझ्या तोंडावर दाबलं, गळा दाबला, मारुन टाकण्याची भीती घातली. यानंतर कापड काढून त्यांनी पिशवीतून एक दोरी काढून दाखवली. त्यांनी आम्हाला व्हिडीओ हवाय असे सांगितले.
त्यासाठी 10 कोटी रुपयांची ऑफर आल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या जीवाला घाबरुन अडचण आणणार नाही हे सांगितले. त्यांनी माझे कपडे काढले, चौथा माणूस होता त्यांनी एक बाई आणली होती. दरवाजा उघडल्यावर बाई आत घेतली. इतर दोघे बाहेर गेले. भाऊ कोळपे याने मोबाईलचा कॅमेरा बाहेर काढला, महिलेला बेडवर झोपण्यास त्याने सांगितलं. तो व्हिडीओ घेत होता. भाऊ कोळपे याने फोटो, व्हिडीओ काढले, व्हिडीओत तो सूचना देतोय, हे रेकॉर्ड झालंय. त्यानंतर महिलेला बाहेर काढल्यानतंर इतर दोघे आत आले.
‘पुण्यातून या व्हिडीओसाठी समोरच्या पार्टीकडून 10 कोटी रुपयांची ऑफर आल्याचे भाऊ कोळपे आणि इतरांनी सांगितल्याचे ऋषिराज पवारने म्हटले आहे. बाईक वरुन जात असताना मित्रांना मेसेज करुन ठेवले होते, हा आला की त्याला पकडा असे सांगितलं होते. जसा भाऊ कोळपे आला तसा त्याला धरण्यात आले. आम्ही पकडून त्याला मित्राच्या घरात कोंडून ठेवले, असे ऋषिराज पवार यानं म्हटले आहे.
शिरूर तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या मांडवगण फराटा परिसरात वाघोली येथील एक चारचाकी मोटार फिरत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. यात राजकीय हस्तक्षेप असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र पोलिसांकडून चौकशीनंतर अधिकृत माहिती समोर येईल. पण, सध्या तरी या प्रकरणात तथ्य असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी माहिती दिली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
Add Comment