ताज्या घडामोडी राजकीय शिरूर संपादकीय

आजपर्यंत शिरूर तालुक्याचे ‘हे’ आहेत कारभारी !

संपादकीय : शिरूर तालुका हा पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक असलेला तालुका आहे. तालुक्याला असलेला राजकीय इतिहास हा देखील मोठा आहे. बंडखोर असलेला तालुक्यात चार पंतप्रधान आणि एक राष्ट्रपती यांनी देखील भेट दिलेली आहे. या शिरूर तालुक्यात जसा शेतकरी वर्ग प्रगल्भ आहे, तितकाच या ठिकाणचा मतदार देखील आहे. मुंबई प्रांत असल्यापासून ते २०२४ पर्यंत या तालुक्याने आजतागत कोणत्याही व्यक्तीला तिनं वेळा आमदार होण्याची संधी दिली नाही. तसेच शिरूर मतदारसंघावर विविध राजकीय पक्षांचा लांब काळापासून प्रभाव राहिला आहे. आज आपण पाहणार आहोत शिरूर तालुक्याला लाभलेले आमदार कोण आहेत…!

राजकीय इतिहास : शिरूर विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहता, १९५२ ते १९५७ मध्ये काँग्रेसचे वि. द. घाटे यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यावेळी मुंबई प्रांताचे असलेले मुख्यमंत्री म्हणून शपथ मोराराजी देसाई यांनी घेतली होती. यानंतर प्रजा समाजवादी पक्षाचे शामकांत मोरे यांनी निवडणूक लढवली आणि १९५७ ते १९६२ येथे विजय मिळवला होता. नुकतीच महाराष्ट्राची निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९६२ च्या विधानसभा निवडणूकीपर्यंत पदभार स्वीकारला होता. यावेळी काँग्रेस पक्षाने शिरूर तालुक्यात मोठी ताकद निर्माण केली आणि प्रजा समाजवादी पक्षाला शह देण्यासाठी काँग्रेसने रावसाहेब पवार या तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. १९६२ च्या निवडणुकीत रावसाहेब पवार यांनी विजय मिळवला. १९६२ ते १९६७ पवार यांनी तालुक्याची धुरा सांभाळली खरी मात्र शामकांत मोरे यांचा झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता. याचाच बदला घेण्यासाठी पुन्हा १९६७ मध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे शामकांत मोरे यांनी पवार यांना पराभूत करून विजय मिळवला व १९६७ ते १९७२ या कालावधीत पुन्हा मोरे आमदार म्हणून निवडून आले. त्यांचा कालावधी १९७२ ते १९७७ असा पुढे राहिला.

पवार यांचा झालेला पराभव लक्षात घेता १९७२ मध्ये काँग्रेसने पोपटराव कोकरे यांना उमेदवारी दिली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली. या निवडणुकीत शिरूर तालुक्यात काँग्रेसच्या कोकरे यांनी या मतदारसंघात विजय मिळवला आणि काँग्रेसचे वर्चस्व कायम ठेवले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीत ( १९७५ ते १९७७ ) भारतीय काँग्रेसच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन १९७७ साली जनता पक्षाची स्थापना केली होती. आणीबाणीनंतर झालेल्या १९७७ मधील सार्वत्रिक निवडणुकांत कांग्रेस पक्षाचा पराभव करून जनता पक्ष हा भारताच्या इतिहासात प्रथमच गैरकाँग्रेस सरकारच्या रूपात सत्तेवर आला. १९७८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता पक्षाच्या वतीने शिरूर मतदारसंघाच्या निवडणूकीत जनता पक्षाचे बाबूराव दौंडकर यांनी सूर्यकांत पलांडे यांना ( एस काँग्रेस ) पराभूत करत विजय मिळवला आणि १९७८ ते १९८० या कालावधीत दौंडकर यांनी एक सामान्य व्यक्तीचा आमदार म्हणून तालुक्यात छाप सोडली.

१९८० साली लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांचे पुन्हा सरकार स्थापन झाले आणि नऊ ठिकाणी असलेल्या बिगर काँग्रेस राज्यातील सरकार बरखास्त केली. चार महिने राष्ट्रपती राजवटीनंतर १९८० साली निवडणुकीत काँग्रेसने २८८ पैकी १८६ जागेवर विजय मिळवला. प्रामुख्याने काँग्रेसने प्रत्येक वेळी पराभवानंतर शिरूर तालुक्यात विधानसभेला चेहरा बदलला होता. १९७७ ला झालेला पराभव पाहता काँग्रेस पक्षाने शिरूर तालुक्यात माणिकचंद उद्योग समूहाचे रसिकलाल धारीवाल यांना संधी दिली, दुसरीकडे शरद पवार काँग्रेस यांनी सूर्यकांत पलांडे यांना उमेदवारी दिली, तसेच १९८० मध्ये तत्कालीन जनता पक्षाचे आमदार बाबूराव दौंडकर अशी तिरंगी लढत झाली. या लढतीत सूर्यकांत पलांडे या एका सामान्य शिक्षकाला शिरूर तालुक्यातील मतदारांनी संधी दिली या मतदारसंघावर काँग्रेसने कब्जा केला.१९८० ते १९८५ या कालावधीत पलांडे यांनी मुंबई दौरे एस टी बसने प्रवास केल्याच्या जाणकार सांगतात. पुढे त्यानंतर १९८५ आणि १९९० मध्ये एस.काँग्रेसचे बापूसाहेब थिटे यांनी सलग दोन वेळा विजय मिळवला. दरम्यान बापूसाहेब थिटे यांना गृहराज्यमंत्री पदी विराजमान होण्याचा मान देखील मिळाला. तो अजतागत कोणत्याही आमदाराला मोडता आला नाही. काही राजकीय घडामोडी नंतर बापूसाहेब थिटे यांनी १९९५ मध्ये काँग्रेसकडून पोपटराव गावडे यांना संधी देण्याचे ठरवले आणि अपक्ष असलेले बाबुराव पाचर्णे यांना पराभूत करत मतदारसंघावर गावडे यांनी विजय मिळवला.

काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी स्वतंत्र निवडणूक लढवली, यावेळी राजकीय बदल होताना पोपटराव गावडे यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) जॉइन केली. अपक्ष असलेले बाबूराव पाचर्णे यांनी आय काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेस काढून पाचर्णे व एनसीपीच्या तिकिटावर शिरूर मतदारसंघातून गावडे अशी प्रामुख्याने लढत झाली या लढतीत गावडे यांनी विजय मिळवत पुन्हा एकदा स्वतःचे तालुक्यात वर्चस्व दाखवले होते.यानंतर एनसीपीने या भागात आपला प्रभाव वाढवला.पाचर्णे यांना काँग्रेसकडून यश दिसत नसल्याने २००४ मध्ये भाजपात प्रवेश केला. बाबूराव पाचारणे यांनी एनसीपी आणि काँग्रेसला आव्हान दिले आणि शिरूर मतदारसंघावर विजय मिळवला. २००९ मध्ये पुन्हा तिरंगी लढत पाहायला मिळाली. यावेळी बाबुराव पाचर्णे अपक्ष, भाजपकडून मंगलदास बांदल आणि एनसीपीचे अशोक रावसाहेब पवार अशी लढत झाली या लढतीत अशोक पवार यांनी या मतदारसंघावर विजय मिळवला. तसेच एनसीपीचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे काम पवार यांनी केले. पुढे २०१४ मध्ये पुन्हा भाजपाचे बाबूराव पाचर्णे यांनी एनसीपीला हरवून विजय मिळवला.

२०१९ मध्ये एनसीपीचे पुनरागमन : २०१९ च्या निवडणुकीत, एनसीपीचे अशोक रावसाहेब पवार यांनी पुन्हा शिरूर मतदारसंघावर विजय मिळवला आणि भाजपाचे बाबूराव पाचर्णे यांना पराभूत केले. यामुळे हे स्पष्ट झाले की, एनसीपीचा शिरूर भागातील प्रभाव अजूनही मजबूत आहे. त्यात २०२२ साली स्व. पाचर्णे यांनी घेतलेला जगाचा निरोप एनसीपी आणखी मजबूत अवस्थेत दिसायला लागली होती.

राष्ट्रवादीत फूट आणि पवार विरोधकांना संधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ज्ञानेश्र्वर ऊर्फ माऊली कटके यांना अजित पवारांनी उमेदवारी जाहीर केली. यांच्यामागे अशोक पवारांचे विरोधक एकजुटीने उभे राहिले. याचाच परिणाम यंदाच्या २०२४ विधानसभा निवडणुकीत दिसून आला. अशोक पवार यांना प्रचंड मताधिक्याने पराभूत करून कटके यांनी विजयाची नांदी शिरूर तालुक्यात आणली.

शिरूर मतदारसंघ २००९ साली विभागला गेला आहे. शिरूर तालुक्यातील ४२ गावे आंबेगाव, तर दुसरीकडे हवेलीतील काही शिरूरला गावे जोडली गेली. मात्र २०२४ साली आंबेगाव-शिरूर आणि शिरूर हवेलीला तालुक्यातील आमदार मिळाला नाही. त्यामुळे तालुक्यात नक्की कुणाचे वर्चस्व राहणार या चर्चांना उधाण आले आहे.

error: Copying content is not allowed!!!