शिरूर : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तहसील कार्यालयातील एका अधिकाऱ्याला पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. शिरूर तहसील कार्यालय येथे महसूल सहाय्यक अधिकारी नितेशकुमार धोंडीबाराव धर्मापुरीकर (पद महसुल सहायक, शिरूर तहसील कार्यालय) असे नाव असून असून यांना पकडले असल्याची माहिती पुणे लाचलुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती पुढील प्रमाणे यातील २८ वर्षे पुरुष तक्रारदार यांचे गट नंबर १९ च्या सात-बारा उता-यावरील इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी तक्रारदार यांनी तहसिलदार कार्यालयास अर्ज केला होता. सदरचा अर्ज नितेशकुमार धर्मापुरीकर यांचेकडे प्रलंबित असून, तक्रारदार यांचे सात-बारा उता-यावरील इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी धर्मापुरीकर यांनी तक्रारदार यांचेकडे ५ हजार रुपये लाच मागणी केलेबाबतची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. तक्रारदार यांच्या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, धर्मापुरीकर यांनी तक्रारदार यांच्याकडून कामासाठी लाचेची मागणी करुन, ती रक्कम तक्रारदाराकडून पंचासमक्ष स्विकारले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत भ्रष्ट अधिकारी यांच्याविरोधात शिरुर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी लाच लुचपत विभाग पोलीस निरीक्षक प्रेम वाघमोरे तपास करत आहेत.
यापूर्वी धर्मापुरीकर यांच्यावर इंदापूर येथे लाचलुचपत विभागाची कारवाई झाली होती. यानंतर पुन्हा लाच घेताना हा अधिकारी आढळल्याने ही कारवाई झाली आहे. शिरूर तहसील कार्यालयातील या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सामान्य नागरिकांकडून अशा पद्धतीने लाच घेऊन कामे पूर्ण करणे यामुळे भ्रष्टाचार आणखी फोफावत चालला आहे. यावर आळा घालण्यासाठी तहसीलदार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी काय पाऊल उचलणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
Add Comment