क्राईम ताज्या घडामोडी पुणे शिरूर हवेली

घोडधरणातुन वाळू माफिया वाळूची चोरी करतात मस्त, मात्र घोडधरणाच्या कडेला राहणारे नागरिक झालेत त्रस्त

शिरूर : शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणातुन सध्या रात्रीच्या वेळेस बेकायदेशीररीत्या बेसुमार वाळूउपसा सुरु असुन या वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटींच्या आवाजाने धरणाच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांच्या झोपा उडाल्या आहेत. मात्र शिरुर महसूल विभाग मात्र याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याने याबाबत नक्की कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

दोन वर्षापुर्वी राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर घोड धरणातील वाळूचा शासनामार्फत रीतसर एक वर्षासाठी लिलाव करण्यात आला. त्यासाठी निमोणे आणि चिंचणी या दोन ठिकाणी शासनाने वाळू डेपो उभारले मात्र सर्वसामान्य लोकांना शासनाच्या दराप्रमाणे किती ब्रास वाळू मिळाली हा संशोधनाचा विषय आहे. हा लिलाव घेणाऱ्या ठेकेदाराने मात्र मोठया प्रमाणात माया गोळा केली.

शासनाचा एक वर्षाचा लिलाव संपल्यानंतर स्थानिक वाळू माफियानी घोड धरणात गेल्या सहा महिन्यापासुन मोठया प्रमाणात बेकायदेशीररीत्या बेसुमार वाळू उपसा सुरु केला असुन रात्रीच्या वेळेस यांत्रिक बोटींच्या साह्याने वाळू उपसा चालु असल्यामुळे घोड धरणाच्या लगतच राहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठया प्रमाणात त्रास होत असुन शेतकऱ्यांची रात्रीची झोप उडाली आहे. त्यामुळे हा वाळू उपसा बंद करण्यात यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

वाळू माफियाची मुजोरी अन हतबल शेतकरी…
घोड धरणातील बेकायदेशीर वाळू उपशाबाबत धरणाच्या कडेला राहणाऱ्या एका शेतकऱ्याने शिरुर येथील तहसीलदार कार्यालयात रीतसर तक्रार केली होती. त्यानंतर मुजोर वाळू माफियानी त्या शेतकऱ्याच्या विद्युत पंपाचे तसेच बोअरवेलचे नुकसान करत विद्युत पंप धरणाच्या पाण्यात टाकुन दिले होते. त्यामुळे वाळूची तक्रार केली तर मुजोर झालेले वाळू माफिया नुकसान करतील या भीतीने शेतकरी तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत.

error: Copying content is not allowed!!!