शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या घोड धरणातुन वाळू उपसा करून वाहतुक करणाऱ्या दोन गाड्यांवर प्रशासनाच्या वतीने गुनाट-चिंचणी रस्त्यावर कारवाई केली आहे. या कारवाईत प्रशासनाने दोन हायवा ताब्यात घेतले आहेत. या दोन हायवा गाड्यांमध्ये चार-चार अशी एकूण आठ ब्रास वाळू असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अवैधरित्या वाळू उपसा कारवाई पूर्वी एक दिवस अगोदर ‘The बातमी’ ने वृत्त प्रसारित केले होते. या अनुषंगाने प्रशासनाला जाग आली आणि महसूल विभाग – पोलीस प्रशासन यांनी या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शिरूर तालुक्यातील वाळू माफियांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कारवाई केली आहे.

वाळूचा उपसा व वाहतूक ही सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या कालावधीतच करता येते. या कालावधीव्यतिरिक्तच्या काळात केलेले उत्खनन अवैध समजून कारवाई करण्यात येईल, असं वाळू उपसा धोरणात स्पष्टपणे सांगितलेलं असतानाही रात्रीच्या वेळेस अवैध वाळू उपसा केला जात आहे. शासनानं गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याकरता वेळोवेळी उपाययोजना केल्या आहेत. तरीही गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याच्या घटना शिरूर तालुक्यात घडत आहेत. या संदर्भात महसूल – पोलिसांनी संयुक्त कारवाई करण्यात आली असून अधिकाऱ्यांनी पंचनामा करुन त्या दोन हायवा महसूल विभागाने ताब्यात घेतल्या असुन या दोन हायवा मध्ये मिळून आठ ब्रास अवैध वाळू सापडली आहे. मंगळवार (दि. ३१) रोजी महसूल विभागाने यावर सुनावणी ठेवली असुन त्यानंतर पुढची कारवाई होणार असल्याचे महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
Add Comment