रांजणगाव : पुणे जिल्ह्याच्या पंचतारांकित असलेल्या रांजणगाव एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करून कंपनीतील वजन काट्यामध्ये बनावट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बसवून फेरफार करत असताना दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेजेल प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करून कंपनीतील वजन काट्यामध्ये फेरफार करण्याचे उद्देशाने वजन काटा ऑफिस मधील डिस्प्ले स्क्रीनला रिमोटद्वारे ऑपरेट होणारे बनावट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बसविताना मिळून आले आहेत. बनावट इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस हे त्यांनी आमच्या कंपनीने डिसेंबर २०२४ मधील स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट हे सोनाक्षी इंटरप्राईजेस अहमदाबाद, गुजरात चे रोहित पटानि ( रा. गुजरात ) यांचे सांगणे वरून कंपनीमधून बाहेर पडणाऱ्या स्क्रॅपचे वजन हे डिस्प्ले स्क्रीन मध्ये फेरफार करून कमी दाखवून सोनाक्षी एंटरप्राईजेसचा आर्थिक फायदा व्हावा यासाठी आरोपी सौरभ सतीश यादव ( वय 23 वर्षे रा. वाडेगव्हाण ता. पारनेर जि. अहिल्यानगर ), सुमंत मंजुनाथ गौडा ( वय 23 वर्षे रा. हाऊसिंगीफारम तालुका जि. शिमोगा), रोहित पटाने रा. गुजरात. (पाहिजे आरोपी) यांनी फेरफार करत असताना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सौरभ व सुमंत या दोन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी रघुनाथ विद्याधर कारेगावकर (वय 55 वर्ष, रा. गिरीकुंज हाउसिंग सोसायटी, तुळशीबाग वाले कॉलनी सहकार नगर 2 पर्वती पुणे ) यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 333, 336(3), 62,3(5) कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पोलीस उप अधीक्षक प्रशांत ढोले, रांजणगाव एमआयडीसी पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय शिंदे,अभिमान कोळेकर, विलास आंबेकर, प्रविण पिठले, राजू ढगे, विलास सरजिने यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे करत आहेत.
Add Comment