ताज्या घडामोडी पुणे संपादकीय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग होणार मोकळा.

वेळापत्रक जाहीर होणार !

पुणे | महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, आणि नगरपालिका, नगरपरिषदा यांचा समावेश आहे. सुमारे तीन वर्षांपासून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे नव्याने राजकारणात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची प्रतिक्षा शिगेला पोहोचली आहे. त्यातच या संस्थांवर प्रशासक नियुक्त करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सुरुवातीला कोरोना महामारीच्या कारणास्तव निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या त्यानंतर ओबीसींच्या राजकिय आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आणि हे प्रकरण कोर्टात गेले. आता या आरक्षणाच्या मुद्यावर २२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात निकाल जाहीर होईल, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे. विविध पक्षांच्या हरकती आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे निवडणुकींचे वेळापत्रक वारंवार लांबणीवर पडले. आता निकालानंतर तात्काळ वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू इच्छिणाऱ्या पुढाऱ्यांना गेल्या तीन वर्षांपासून प्रतिक्षा करावी लागली आहे. निवडणुकीची तयारी म्हणजे मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो. या तयारीसाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसे खर्च केले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला असल्याने आगामी जिल्हा परिषद आणि इतर निवडणूकीत देखील मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होणार असल्याचे बोलले जात आहे.

येणाऱ्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या कोर्टाच्या निर्णयाकडे अनेकांच्या नजरा लागून आहेत. निकाल लागल्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. तर लवकरच निवडणुकीचे वेळापत्रक देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी आता कंबर कसली आहे.

error: Copying content is not allowed!!!