शिक्रापूर | शिरुर तालुक्यात भारतीय जनता पक्षाची मोठ्या प्रमाणात ताकद आहे. तालुक्यात या पक्षाची ताकद आणखी वाढवण्यासाठी पदाधिकारी वेगवेगळ्या संधी शोधत असतात अशातच नुकताच युवा मोर्चाचे पदाधिकारी असलेले रोहित खैरे यांचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही म्हणून तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी एक मंत्री आणि एका आमदारांसह खैरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
यापूर्वी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खैरे यांच्या आग्रहाखातर निवासस्थानी भेट दिली होती. दरम्यान भाजपच्या युवा मोर्चाचे पदाधिकारी असलेले रोहित खैरे नेहमीच पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असतात. भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे आणि रोहित खैरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. दरम्यान या शिरुर तालुक्याच्या भाजपमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. हे ओळखून भाजपातील अनेक युवा नेते शिरूरच्या राजकारणात भक्कम पाय रोवण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातीलच एक प्रकार म्हणजे सोनवणे यांच्या पुढाकाराने राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांनी रोहित खैरे यांच्या घरी जाऊन विवाहाला उपस्थित न राहता आल्याने दिलगिरी व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपचे राहुल कुल हे एकमेव आमदार आहेत. आमदार कुल यांची प्रशासनावर मोठी पकड आहे, त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. आमदार कुल यांची शिरुर तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नेहमीच मोठी मदत होत असते, प्रदीप कंद, आबासाहेब सोनवणे हे कुल यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. आमदार कुल यांनी शिरुर भाजपचे एकप्रकारे पालकत्व स्वीकारले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच रोहित खैरे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह खैरे यांचे घर गाठले.
दरम्यान पूर्वी शिवसेनेमध्ये सामान्य शिवसैनिकाचे मत देखील पक्षात विचारात घेतले जायचे परंतु हळूहळू ती जागा आता भाजप घेतलेली पाहायला मिळत आहे. सामान्य कार्यकर्ता असो वा पदाधिकारी त्याला ताकद देण्यासाठी पक्षातील नेते मंडळी कुचराई करत नाही याची प्रचिती यानिमित्ताने आली आहे.
Add Comment