तिळगुळ घ्या गोड गोड बोला..!
महाराष्ट्रातील राजकारणाची एक संस्कृती आहे. इथे ती संस्कृती जपली जाते. नुकत्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका मुलाखतीत त्यांना उध्दव ठाकरे यांच्या भेटीबद्दल विचारलं गेलं त्यावेळी उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात राजकीय संस्कृती आहे. दक्षिण राज्यात पाहिलं तर दोन पक्षाचे नेते एकमेकांशी बोलत देखील नाही, तिकडच्या राजकारणात एकमेकांचे ‘खून के प्यासे’ असतात. परंतु महाराष्ट्रात तसं नाही.
अगदी त्याचच एक उदाहरण म्हणजे नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे दोन पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील दोन पक्ष तयार झाले. यामध्ये आंबेगाव- शिरुर विधानसभा मतदारसंघात मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासूनच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यापासून दुरावलेले देवदत्त निकम पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन पक्ष तयार झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम विभिन्न पक्षाचे आंबेगाव – शिरुर मतदारसंघाचे शिलेदार झाले, आणि पुढे एकमेकांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढविली. निवडणूक काळात दोन्ही बाजूंनी निवडणूक प्रतिष्ठतेची केली गेली. निकम यांच्या बाजूचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अनेकदा आक्रमक पाहायला मिळाले. कोणत्याही भावात आपण ही निवडणूक जिंकतोय हा विश्वास देवदत्त निकमांसह कार्यकर्त्यांना आला होता. मतदारसंघात वातावरणही तसेच पाहायला मिळत होते.
शिरूरच्या ४२ गावांत निकम यांना सामान्य मतदारांनी डोक्यावर घेतले होते. हेच निवडणूक काळातील वातावरण निकम यांना शेवटपर्यंत राखता आले नाही. किमान २५ हजार मतांनी निवडून येणार अशी परिस्थिती मतदारसंघात निर्माण झाली होती परंतु, समोरचे थेट उमेदवार (दिलीप वळसे पाटील) सोडून त्यांच्या सहकाऱ्यांवर केलेली टीका, आपल्या सहकाऱ्यांशी असलेली वागणूक, शेवटच्या टप्प्यात बिघडलेले बूथ व्यवस्थापन, वळसे पाटील यांच्या बाजूने झालेले मोठे अर्थकारण. ही सगळी कारणे देवदत्त निकम यांच्या थोड्या फरकाने झालेल्या पराभवाची चर्चिली जात आहेत.
वळसे पाटील यांचा राजकारणात प्रदीर्घ अनुभव आहे. याच मतदारसंघातून त्यांनी आठव्यांदा ही निवडणूक लढवली आहे. कार्यकर्त्यांचा मोठा संच त्यांच्याकडे आहे. मोठमोठे उद्योगपती, मोठे पदाधिकारी, हक्काचे मतदार असलेले वेगवेगळ्या भागातील नेते, कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद, यापूर्वी केलेली विकासकामे, स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत या सगळ्या बाजू या निवडणुकीत वळसे पाटील यांच्या जमेच्या होत्या. परंतु शरद पवारांची बाजू सोडून अजित पवारांनी बाजू घेतल्याने मतदारसंघात प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. यामध्ये वळसे पाटील यांनी ही परिस्थिती त्यांच्या अनुभवाच्या जोरावर हाताळली. उद्योगपतींनी ही निवडणूक हातात घेतली अशा प्रकारच्या चर्चा मतदारसंघात सातत्याने होत राहिल्या. अपघातातील आजारातून बाहेर पडल्यानंतर वळसे पाटील यांनी मतदारसंघ निवडणूक काळात पिंजून काढला.
या निवडणुकीत अनेक गावांत दोन गट तयार झाले, भावकित दोन गट झाले, एकमेकांचे मित्र एकमेकांच्या विरोधात गेले, ग्रामपंचायत पातळीवर कार्यकर्ते एकमेकांचे राजकीय विरोधक झाले, एवढंच नाही तर दोन भाऊ वेगवेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाले, पती पत्नीतही या निवडणुकीत वेगवेगळा मतप्रवाह पाहायला मिळाला. हे सगळं होत असताना निवडणूक होऊन दोन महिने व्हायला आले, अजूनही अनेकजण एकमेकांशी संवाद करत नाहीत. गावगड्यात काम करणारे कार्यकर्ते एकमेकांशी संवाद करायला तयार नाही. त्याउलट थोड्या वेळासाठी का होईना पण, थापलिंग देवाच्या यात्रा उत्सवात दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम एका व्यासपीठावर आले, आणि एकमेकांचे आभार एकमेकांनी मानले याशिवाय एकमेकांनी संवादही साधला. गावगड्यातील कार्यकर्ते अजूनही पराभव पचवू शकले नाहीत. परंतु महाराष्ट्रात राजकीय संस्कृती आहे. निवडणूक झाली, जय पराजय झाला आता एकमेकांनी संवाद ठेवायला हवा.
एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढणारे नेते जर एकमेकांशी संवाद ठेवत असतील तर ही बाब कौतुकास्पद आहे, तशाच प्रकारे सामान्य कार्यकर्त्यांनी बोध घेतला पाहिजे. आपला मित्र, आपला सहकारी, आपला भाऊ या निवडणुकीत दुरावला असेल तर स्वतः पुढाकार घेऊन एकमेकांशी आनंदाचा संवाद साधला पाहिजे. गावात एकमेकांना चहा पाजला पाहिजे. हीच शिकवण दोन्ही नेत्यांनी आपल्या कृतीतून व्यक्त केली आहे. त्यामुळे झाले गेले निवडणुकीचे क्षण विसरून एकत्र यायला हरकत नाही. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला..!
Add Comment