रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे भोगवटा वर्ग २ च्या जमिनीचे दुबार कुलमुखत्यारपत्र तयार करून ती जमीन विक्री करण्याचा आरोप करत, पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक प्रभाकर पांडुरंग भोसले यांनी १२ जणांविरोधात रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत रांजणगाव गणपती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गट नं. ४२१ मध्ये मूळ मालकांनी २०१० साली जमीन विक्री केली होती. मात्र, मुख्य आरोपी दीपक पंचमुख यांनी दुबार कुलमुखत्यारपत्र तयार करून, त्या जमिनीची तिसऱ्या पक्षाला विक्री करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच अन्य १२ व्यक्तींनीही बनावट दस्तऐवज तयार करण्यास सहकार्य केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये कुलमुखत्यार धारक दिपक राजकुमार पंचमुख यांच्यासह भीमराव सारंग रोकडे, सुनिता भीमराव रोकडे, सागर भीमराव रोकडे, निशा भीमराव रोकडे (लग्नापुर्वीचे नाव) निशा अभिषेक सकपाळ (लग्नानंतरचे नाव), सविता वसंत राजगुरु, मयूर वसंत राजगुरु, सुभाष सारंग रोकडे, मंगल सुभाष रोकडे, स्वप्निल सुभाष रोकडे, प्रशांत सुभाष रोकडे, राकेश सुभाष रोकडे आणि स्वाती सचिन गायकवाड या सर्व व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान शिरुर तालुक्यातील अनेक भागांत जमिनीला सोन्याचे भाव आले असल्याने जमीन खरेदी विक्रीवर अनेकांचा व्यवसाय सुरु आहे, परंतु या व्यवसायात फसवणूकीचे प्रमाण दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चालले आहे. यामुळे प्लॉटींग, कारखानदारी, गोडाऊन, गुंतवणूक, गृहनिर्मिती प्रकल्प यांसाठी मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी विक्री व्यवसाय सुरु आहे. अशा प्रकारचे व्यवसाय करणारे फसवणूक करून स्वतःची पोळी भाजून घेत आहेत परंतु यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळेच सातत्याने जमीन खरेदी विक्री प्रकरणावरून शिरुर तालुक्यातील शिक्रापूर, रांजणगाव गणपती, शिरुर पोलिस ठाण्यात सातत्याने तक्रारी दाखल होत आहेत.
वरील फसवणूक प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येतात का यासाठी या फसवणूक प्रकरणाचा तपास रांजणगाव गणपती पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे करत आहेत.
Add Comment