शिक्रापूर | काल (मंगळवारी) करंदी (ता. शिरुर) येथे अनधिकृत असलेल्या टायरच्या दुकानाला आग लागली. शेजारी असलेल्या आणखी एका अनधिकृत गॅसच्या दुकानालाही आग लागली यातील एक अनधिकृत दुकान एका पोलिस अधिकाऱ्याने थाटले असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात आहेत. पोलिसच आपल्या खाक्या वर्दीचा वापर अनधिकृत व्यवसाय करण्यासाठी करतात की काय ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
चाकण – शिक्रापूर रस्त्यावर करंदी गावच्या हद्दीत भारतगॅस फाटा येथे कोणत्याही परवानगी शिवाय एक टायरचे दुकान गेल्या ५ ते ६ वर्षांपासून सुरू होते. या दुकानात जुने टायर पुन्हा नव्याने वापरात येण्यासाठी त्यावर प्रक्रिया करण्याचा कारखाना सुरू करण्यात आला होता. यंत्राच्या साहाय्याने आगीच्या भट्टीमध्ये हे काम केले जात होते. शेजारीच या कारखान्याला लागून अनधिकृत रित्या गॅसची हेराफेरी केली जात होती. घरगुती वापराच्या गॅसच्या टाक्यातून एका पाईपद्वारे दुसऱ्या टाकीत गॅस भरला जात होता व त्याची अनधिकृत विक्री या दुकानात केली जात होती. या सगळ्याची कल्पना ग्रामपंचायत, पोलिस किंवा महसूल विभागाला होती परंतु सोयीस्कररित्या या गोरखधंद्याकडे दुर्लक्ष केले जात होते.
विशेष म्हणजे यातील एक अनाधिकृत दुकान हे शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये काही वर्षांपूर्वी कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे होते. ज्या काळात हे पोलिस अधिकारी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये रुजू होते तेव्हा त्यांनी पोलिस खाकीचा वापर करून या ठिकाणी व्यवसाय सुरू केला होता. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथून त्यांची बदली खेड तालुक्यातील एका पोलिस स्टेशनला झाली त्यानंतरही हा व्यवसाय सांभाळण्यासाठी त्यांचे सातत्याने या भागात येणे – जाणे चालूच होते. दरम्यान पोलिस अधिकाऱ्याचा हा व्यवसाय असल्यामुळे सगळ्याच विभागाने दुर्लक्ष केले अशी चर्चा यानिमित्ताने उपस्थित झाली आहे.
दरम्यान या आगीच्या घटनेत ५ ते ६ दुकानांना फटका बसला, एवढी मोठी घटना घडल्यानंतर तरी प्रशासनला जाग येते की नाही हे पाहणं औत्सुक्याचे असणार आहे.
अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे, अतिक्रमण करून अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याची माहिती ग्रामपंचायतने महसूल विभागाला दिली होती. पुन्हा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ प्रतिनिधी तहसीलदारांना भेटून याबाबत तक्रार करणार आहोत. – शारदा राजेंद्र ढोकले (सरपंच, करंदी)
Add Comment