शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात महसूल प्रशासनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माती उत्खनन व चोरी प्रकरणात आरोपीची ओळख पटलेली असताना देखील अज्ञात व्यक्तींविरोधात महसूल प्रशासनाच्या वतीने शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे मोठ्या प्रमाणावर माती चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार सुरू होता. या संदर्भात जमीन मालक विनायक लक्ष्मण फडके (व्यवसाय. वकील, रा. वारजे माळवाडी, पुणे ) यांनी दि. २८ मार्च रोजी महसूल प्रशासनाकडे तक्रार फोन आणि मेसेजद्वारे तक्रार केली होती. याच अनुषंगाने ग्राम महसूल अधिकारी यांनी पंचनामा केला आहे. तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी तक्रारदार विनायक फडके तसेच विरुद्ध नंदू ओव्हाळ, तात्याभाऊ ओव्हाळ, कृष्णाबाई अण्णा माने, राजेंद्र उमाजी माने यांना पुराव्याचे कागदपत्रांसह खुलासा करावयास असल्याचे नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र उत्खनन करत असलेले व्यक्ती माहीत असताना देखील ३० एप्रिल रोजी मंडल अधिकारी नंदकुमार खरात यांनी चक्क अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
तसेच माती उत्खनन व चोरीच्या संपूर्ण घटनेबाबत फिर्यादी फडके यांना योग्य ती कार्यवाही होत नसून व मदत मिळत नसल्याने त्यांनी शिरूर पोलिस ठाण्यात अजित ओव्हाळ, नंदू ओव्हाळ, तात्याभाऊ ओव्हाळ, कृष्णाबाई अण्णा माने, राजेंद्र उमाजी माने ( सर्व रा. शिंदोडी, ता. शिरूर,पुणे ) यांच्याविरोधात कायदेशीर फिर्याद दिली असून महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आहे का? याबाबत सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
Add Comment