क्राईम ताज्या घडामोडी

तिहेरी हत्याकांड | आरोपीला अटक, मात्र पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल आणले कुठून…?

शिरूर : पुणे ग्रामीण पोलिसांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अत्यंत क्रूर तिहेरी हत्याकांडाचा छडा लावत आरोपीस अटक केली आहे. या हत्याकांडातील आरोपी याला अहिल्यानगर (जि. नगर) येथून अटक करण्यात आली आहे. आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पुरावा नष्ट करण्यासाठी हे पेट्रोल कुठून आणले असा सवाल उपस्थित होत आहे.

ही थरकाप उडवणारी घटना दिनांक २३ मे रोजी घडली. आरोपी गोरख बोखारे याने स्वाती सोनवणे या महिलेच्या विवाहाच्या मागणीला नकार देण्यासाठी तिचा आणि तिच्या दोन चिमुकल्या मुलांचा अमानुषपणे गळा दाबून तसेच डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर गुन्ह्याचे कोणतेही पुरावे उरू नयेत म्हणून मृतदेहांवर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय की, आरोपीने हे पेट्रोल नक्की कुठून आणले? आणि सर्वसामान्य नागरिकांना बाटलीत पेट्रोल विकण्यास संबंधित पेट्रोल पंप चालकांना परवानगी आहे का?

सध्याच्या नियमांनुसार, पेट्रोल हा अत्यंत ज्वलनशील आणि धोका निर्माण करणारा पदार्थ असल्यामुळे बाटलीत किंवा कोणत्याही असुरक्षित साधनात पेट्रोल विकण्यास बंदी आहे. मात्र तरीदेखील काही पेट्रोल पंपांवर ही विक्री सुरु असल्याचे निदर्शनास येते. यामुळेच या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आणि संबंधित विभागाने पेट्रोल पंपांची तपासणी करणे गरजेचे ठरत आहे.

पोलिसांनी आरोपीविरोधात हत्या, पुरावा नष्ट करणे आणि अन्य संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!