शिरूर : कारेगाव येथे रविवारी (28 जुलै) सायंकाळी भीषण अपघात घडला. पोहण्यासाठी शेततळ्यात गेलेल्या चार मुलांपैकी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून उर्वरित दोघे सध्या गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. या दुर्घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मृत मुलांमध्ये अनमोल उर्फ बाबू प्रविण पवार (वय 13) व कृष्णा उमाजी राखे ( वय 8, दोघे रा. कोहकडे हॉस्पिटल शेजारी, कारेगाव ) यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत असलेले आदेश प्रविण पवार (वय 14) व स्वराज गौतम शिरसाठ (वय 13, रा. अनघा हाइट्स, कारेगाव) हे दोघे जखमी झाले आहेत.
फिर्यादी, प्रदीप रामराव पवार यांनी सांगितले की, संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही मुले कारेगाव शिवारातील बाभुळसर खुर्द परिसरातील शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती. पोहताना अनमोल व कृष्णा हे दोघे पाण्यात बुडाले. त्यांना तातडीने श्री गणेशा हॉस्पिटल शिरूर येथे नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हवालदार गणेश आगलावे करत आहेत.
Add Comment