शिरूर : रांजणगाव गणपती परिसरात अवैध मटका जुगाराचे अड्डे उघडपणे सुरू असून, अंगणवाडी शाळेच्या मागे ‘सोरट’ आणि ‘गुडगुडी’ या प्रकारातील जुगार खेळवले जात आहेत. दिवसाढवळ्या चालणाऱ्या या अवैध धंद्यामुळे परिसरातील नागरीक, महिलावर्ग आणि विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
सदर जुगार अड्ड्यावर दररोज मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे. स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा या अड्ड्यांवर वावर असून, पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या धंद्याला अधिकच चालना मिळाली आहे. सोरट व गुडगुडी हे मटक्याचे पारंपरिक प्रकार असून, यात विशिष्ट आकड्यांवर पैसे लावून जुगार खेळला जातो. स्थानिक तरुण पिढी, बेरोजगार युवक या आकर्षणाला बळी पडत असून त्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे.
अष्टविनायकपैकी श्री क्षेत्र रांजणगाव येथील अंगणवाडी शाळेच्या परिसरात हे अड्डे असल्याने लहानग्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी, स्थानिकांनी यासंदर्भात तक्रारीही केल्या आहेत. मात्र, अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्यामुळे संतप्त नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने तत्काळ कारवाई करून हे मटका अड्डे बंद करावेत, अशी जोरदार स्थानिकांकडून मागणी होत आहे.
याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
Add Comment