शिरूर : शाळा ही मुलांच्या शिक्षणाचे आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे मुख्य केंद्र असते. त्यामुळे शाळेच्या परिसरात काय असावे आणि काय नसावे, हे ठरवताना समाज, पालक, शिक्षक आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन विचार करणे गरजेचे आहे. शाळेच्या आजूबाजूचा परिसर सुरक्षित, प्रेरणादायी आणि आरोग्यदायक असावा, ही काळाची गरज आहे.
शाळेजवळ काय असावे आणि काय नसावे याचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे. यासाठी काय असावे आणि नसावे असे दोन गटात विभाजन करण्यात आले आहे.
शाळेजवळ असावे:
१. ग्रंथालय आणि अभ्यासिका : विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे, यासाठी जवळपास ग्रंथालय असणे उपयुक्त ठरते.
२. क्रीडांगण व व्यायाम सुविधा : मुलांच्या शारीरिक विकासासाठी मैदाने, खेळाची साधने आणि व्यायामशाळा शाळेजवळ असाव्यात.
३. पोलीस चौकी किंवा सुरक्षा यंत्रणा : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जवळच पोलीस चौकी किंवा सीसीटीव्ही यंत्रणा असणे आवश्यक आहे.
४. वाहतूक सुलभ करणारे उपाय : झेब्रा क्रॉसिंग, वेग मर्यादा फलक, ट्रॅफिक सिग्नल्स यांसारख्या सुविधा विद्यार्थी आणि पालकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या आहेत.
५. आरोग्य केंद्र किंवा दवाखाना : आपत्कालीन आरोग्यसेवा मिळण्यासाठी जवळपास प्राथमिक आरोग्य केंद्र असावे.
६. स्वच्छ खाद्यपदार्थांची दुकाने : पौष्टिक आणि स्वच्छ अन्न मिळावे यासाठी शासन मान्यताप्राप्त स्टॉल्स/कॅंटीन असावेत.
शाळेजवळ नसावे :
१. दारूची दुकानं आणि सिगारेट स्टॉल्स : अशा दुकानांचा विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो. हे शालेय परिसरात पूर्णतः प्रतिबंधित असावे.
२. जुगार आणि इंटरनेट कॅफे : काही इंटरनेट कॅफेंमध्ये अनुचित प्रकार घडतात. विद्यार्थ्यांना चुकीच्या सवयी लागू नयेत म्हणून अशा गोष्टी टाळाव्यात.तसेच जुगार हा देखील विद्यार्थी वर्गासाठी त्यांच्या आयुष्यावर घटक परिणाम करू शकतो
३. उच्च आवाजातील ध्वनिक्षेपक : धार्मिक स्थळे, स्टेज शो किंवा इतर कार्यक्रमांमधून होणारा मोठा आवाज अभ्यासावर परिणाम करू शकतो.
४. वाहतुकीची गर्दी व ट्रक मार्ग : अवजड वाहने, ट्रक मार्ग किंवा व्यस्त रस्ते विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण करतात.
५. कचरा डेपो किंवा घाणेरडी ठिकाणं : अशा ठिकाणांमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे शाळेजवळ स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे.
शाळेचा परिसर म्हणजे केवळ इमारतींचा समूह नसून तो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक सुरक्षित व पोषक आधार असतो. प्रशासनाने आणि समाजाने यासाठी एकत्र येऊन नियोजन करणे आवश्यक आहे.
Add Comment