शिरूर : रांजणगाव गणपती परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. विशेषतः मटका, जुगार, गुडगुडी आणि सोरट यासारख्या गैरकृत्यांची माहिती थेट पोलिस निरीक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आली होती. मात्र, आश्वासन मिळाल्यानंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
पोलिस निरीक्षक यांनी दिलेले आश्वासन की “तातडीने कारवाई केली जाईल”, हे केवळ बोलाचीच कढी ठरत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अष्टविनायकपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती परिसरातील शाळा, अंगणवाडी यांच्या शेजारीच हे अवैध धंदे खुलेआम सुरू असून, त्यामुळे लहान मुलांवर आणि महिलांवर प्रतिकूल परिणाम होत आहेत.
स्थानिकांनी, तसेच काही पालकांनी या विरोधात आवाज उठवला व वेळोवेळी पोलिसांना तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. पोलिस यंत्रणेची उदासीनता आणि दुर्लक्षामुळे अशा अवैध धंद्यांना बळ मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.
सध्या नागरिकांचे एकच मागणे आहे – “आश्वासन पुरे, कृती हवी!” पोलिस प्रशासन याबाबत कोणती ठोस पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Add Comment