शिरूर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप गट रचना जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून थंडावलेल्या राजकीय वातावरणात आता बदल होताना दिसत आहे. अनेक राजकीय नेते, पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांनी आपापल्या गटांतील गणितं मांडायला सुरुवात केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अनेक नेते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी गावातील प्रश्न, नागरी अडचणी, शासकीय योजनांचा आढावा या सर्वांपासून दूर होते. स्थानिक पातळीवर जनतेच्या अडचणींवर दुर्लक्ष होत असतानाच, आता गट रचना जाहीर होताच हेच नेते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.
काही काळ गप्प बसलेले नेते आता कार्यकर्त्यांच्या घरी जेवणावळींच्या निमित्ताने दाखल होत आहेत. विविध गावांमध्ये भेटीगाठी, सामाजिक कार्यक्रम, शुभेच्छा भेटी, वाढदिवस सोहळे, वाडी वस्तीवरील दौरे सुरू झाले आहेत. नेत्यांकडून स्थानिक पातळीवरील गटबाजी लक्षात घेत इच्छुक कार्यकर्त्यांची गाठभेट घेऊन त्यांचं मानसिक पडसाद मोजण्यास सुरुवात झाली आहे. कोण कुठल्या गटात येतंय, कुणाची ताकद किती आहे, जातीय समीकरण कसे बसतात याचा बारकाईने अभ्यास सुरू झाला आहे.
निवडणूक जवळ आली तरच नेते फिरकतात आणि इतर वेळी मात्र संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही नागरिकांनी सोशल मीडियावरून गावागावात नाराजीचा सूर आवळला जात आहे.
पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण अधिकच तापणार असून, गट रचना अंतिम झाल्यानंतर खरी चुरस आणि स्पर्धा सुरू होणार आहे. मात्र टीकेच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी आता केवळ निवडणुकीपुरती उपस्थिती न ठेवता, सातत्याने लोकांमध्ये राहून त्यांची कामे करावीत, अशी जनतेची अपेक्षा आहे.
Add Comment